फडणवीस सरकारने मासेमारी करणाऱ्यांना फसवले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

‘ते’ मंत्री कोण?
वाळूमाफिया प्रमाणे आता मत्स्यमाफिया तयार होत आहे. राजकीय नेतेही मासेमारीच्या धंद्यात  येऊ लागले आहेत. गोसेखुर्द प्रकल्पातील ठेका एका मंत्र्याने घेतला. त्यांच्या संस्थेला विशेष  बाब म्हणून मान्यता दिल्याचा गौप्यस्फोट नाना पटोले यांनी केला. मात्र, संबंधित मंत्र्यांचे नाव घेण्याचे त्यांनी टाळले. यामुळे ‘ते’ मंत्री कोण याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाचे ऐकत नाही आणि मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्यासमोर बोलण्याचे धाडस नाही अशी जाहीर टीका करणारे भाजपचे खासदार नाना पटोले यांनी आज मासेमारी करणाऱ्यांना फसविल्याबद्दल फडणवीस सरकारवरच गुन्हे दाखल करण्याची मागणी  करून आणखी खळबळ उडवून दिली. 

मासेमारीसंदर्भात राज्य शासनाने ३० जूनला काढलेल्या आदेशाविरुद्ध मासेमारी-शेतकरी संपर्क अभियान सभा बजाजनगर येथील प्रशांत पवार यांच्या जय जवान जय किसान संघटनेच्या कार्यालयात घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. सभेला प्रफुल्ल पाटील, प्रकाश लोणारे, अशोक बर्वे, चंद्रलाल मेश्राम, प्रकाश मोढरे, रामदास पडवळ देवीदास चवरे उपस्थित होते. 

नाना पटोले म्हणाले की, शासनाचा ३० जूनचा आदेश परंपरागत मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे. मासेमारीचा ठेका देताना त्यासाठी पैसे घेऊन तलाव लीजवर दिला  जातो. तलावात वर्षभर पाणी नसते. 

फक्त तीन, चार महिनेच पाणी असताना वर्षभरासाठी पैसे घेतले जातात. ही मासेमारी करणाऱ्यांची फसवणूक आहे. शासनाचे धोरण बड्या व्यावसायिकांच्या फायद्याचे आहे. एकीकडे रोजगार देण्याची भाषा केली जात असताना दुसरीकडे मासेमारांचा रोजगार हिरावून त्यांना बेरोजगार करण्याचा घाट घातला जात आहे. सरकारने ३० जूनचा आदेश बदलला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.  शासन आपल्या वाट्याला जाणार नाही अशा व्यवस्था उभी करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. अन्य वक्‍त्यांनी ३० जूनचा आदेश कशा प्रकारे मासेमारांच्या विरोधात आहे याचा पाढा वाचून दाखविला.