नेताजींच्या पुतळ्याला कचऱ्याचा वेढा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

नागपूर - शहरातील चौक, रस्त्यांच्या बाजूला असलेले क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक व महान नेत्यांचे पुतळे दुर्लक्षित असल्याचे चित्र आहे. यानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांची अवमानना होत असल्याचे मानस चौकातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याजवळील कचऱ्याने अधोरेखित केले.

नागपूर - शहरातील चौक, रस्त्यांच्या बाजूला असलेले क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक व महान नेत्यांचे पुतळे दुर्लक्षित असल्याचे चित्र आहे. यानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांची अवमानना होत असल्याचे मानस चौकातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याजवळील कचऱ्याने अधोरेखित केले.

नागनदी व संत्र्याप्रमाणेच नागपूर पुतळ्यांचेही शहर म्हणून ओळखले जाते. शहरातील चौक व रस्त्यांच्या बाजूला एकूण पन्नासावर पुतळे आहेत. पुतळा बघताच स्वातंत्र्य लढ्याचा काळ, इतिहास अनेकांच्या दृश्‍यपटलावर येतो. मात्र, शहरातील पुतळ्यांची जबाबदारी असलेले महापालिका पुतळ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

मानस चौकात असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याभोवती कचरा गोळा करीत असल्याने परिसराच्या सौंदर्याला ग्रहण लागले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याच्या आवारात फेरफटका मारला असता अनेक दिवसांपासून येथे सफाई झाली नसल्याचे दिसून आले. पुतळ्याच्या आवारात प्रवेश करताच प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. पुतळा परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून, केवळ जयंती व पुण्यतिथीलाच महापालिकेला जाग येते काय, असा उपस्थित होतो.

शहराच्या प्रतिमेला धक्का
नेताजींचा पुतळा सीताबर्डी येथील रेल्वे स्टेशन व मध्यप्रदेश बसस्थानकाजवळ आहे. रेल्वेस्थानक तसेच मध्यप्रदेश बसस्थानकावर अनेक नागरिक इतर शहरातून नागपुरात येतात. सीताबर्डी, महाल, इतवारीसारख्या बाजारपेठेत जाण्यासाठी या प्रवाशांना मानस चौकातून जावे लागत असल्याने या पुतळ्याजवळील कचऱ्याने शहराच्या स्वच्छ प्रतिमेलाही धक्का लागत आहे शिवाय महान नेत्यांबाबत आदर नसल्याचाही संकेत यातून मिळते.

कधीकाळी पुतळ्याभोवती सौंदर्यीकरण केले होते. परंतु, आज येथे झाडांच्या नावावर सीताबर्डी किल्ल्याच्या उंच व मोठ्या झाडांच्या फांद्या पुतळ्याकडे झुकल्या आहेत व झुडपे वाढली आहेत. महापौरांना याबाबत अनेकदा पत्र दिले व चर्चा केली. महापौरांनी स्वच्छतेचे आदेश दिले. परंतु, प्रशासन त्यांच्या आदेशालाही जुमानत नाही. 
- मारोती वानखेडे, महामंत्री, फॉरवर्ड ब्लॉक