गौरीने रचला स्मरणशक्तीचा नवा विश्‍वविक्रम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

नागपूर - संविधानपठणाचा विक्रम रचणारी नागपूरची गौरी कोढे हिने आज स्मरणशक्तीचा नवा विश्‍वविक्रम रचला. एका मिनिटात ५० वस्तू पाठ करून त्या क्रमाने लावण्याची किमया साधणाऱ्या बारा वर्षीय गौरीचे नाव गिनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात येईल. नेपाळच्या अर्पण शर्मा याचा ४२ वस्तूंचा विक्रम मोडीत गौरीने नवा विक्रम प्रस्थापित केला.

नागपूर - संविधानपठणाचा विक्रम रचणारी नागपूरची गौरी कोढे हिने आज स्मरणशक्तीचा नवा विश्‍वविक्रम रचला. एका मिनिटात ५० वस्तू पाठ करून त्या क्रमाने लावण्याची किमया साधणाऱ्या बारा वर्षीय गौरीचे नाव गिनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात येईल. नेपाळच्या अर्पण शर्मा याचा ४२ वस्तूंचा विक्रम मोडीत गौरीने नवा विक्रम प्रस्थापित केला.

शंकरनगर येथील साई सभागृहात हे आयोजन करण्यात आले. भारताचे संपूर्ण संविधान पाठ करून वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया, जिनियस अवॉर्ड तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये तिचे नाव यापूर्वीच नोंदविण्यात आले आहे. आज गौरीपुढे एक मोठे आव्हान होते ते एका मिनिटात क्रमानुसार वस्तू पाठ करणे आणि त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांत त्या सर्व वस्तू परत क्रमाने लावणे. गौरीने अतिशय शांततेत हे आव्हान स्वीकारले आणि एका मिनिटांत सर्व वस्तू पाठ केल्या. विशेष म्हणजे ४२ वस्तू जश्‍याचा तशा लावून गौरीने नेपाळचा जागतिक विक्रम मोडीत काढला होता. पण, आणखी आठ मिनिटे तिच्याकडे शिल्लक होती. तेवढ्या वेळात तिने ५३ वस्तूंपर्यंत मजल मारली. त्यापैकी ५० वस्तूंचा क्रम अचूक ठरल्यामुळे तिने विश्‍वविक्रमावर मोहर उमटविल्याची घोषणा परीक्षकांनी केली. गौरीने एका मिनिटात वस्तूपाठ केल्यानंतर परीक्षकांनी सर्व वस्तू अस्ताव्यस्त केल्या. त्यामुळे त्या सर्व आठवून एका क्रमात लावणे अतिशय आव्हानात्मक होते. तिच्या या विक्रमाचे नागपूकर साक्षीदार ठरले. यावेळी महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, समाजसेविका सोनाली घोडमारे, विश्‍वविक्रमवीर सुनीता धोटे आणि सुनील वाघमारे यांनी गौरीला शुभेच्छा दिल्या. विशाल बोडासे आणि संदीप मोहोड निरीक्षक होते. तर बी. एन. देशमुख आणि रवींद्र कुळकर्णी मुख्य परीक्षकांच्या भूमिकेत होते. डॉ. अनिल बजाज यांच्या मार्गदर्शनात आयोजन झाले. यावेळी गौरीची आई वैशाली व वडील मनीष कोढे यांची उपस्थिती होती.

रटून नव्हे, तर समजून अभ्यास केल्यावर नक्कीच फायदा होतो. स्मरणशक्तीचा कस लागतो.
-गौरी कोढे

गौरीवर पूर्ण विश्‍वास होता; पण शेवटच्या काही मिनिटांमध्ये माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. तिच्यावर आम्हाला अभिमान आहे. 
-वैशाली कोढे, गौरीची आई

Web Title: nagpur news gauri Memory power