शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या

नागपूर - राज्य शासनातर्फे नकार दिला जात असला तरी भाजपची सत्ता असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव एक मताने पारित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, पीकविम्याचे पैसे मिळावे, तूरखरेदीत सुधारणा व्हावी आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी आदी मुद्द्यांवर सभा चांगलीच गाजली.

विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे, राष्ट्रवादीचे चंद्रशेखर चिखले यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उचलून धरला. शासनाने शेतकऱ्यांची तूरखरेदी केली. परंतु, अद्याप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची तूर बाजार समितीत पडलेले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांची संपूर्ण खरेदी होऊ शेकली नाही, त्यामुळे तूरखरेदीला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी सदस्यांनी केली. दरम्यान, कमलाकर मेंघर यांनी कॉंग्रेसच्या काळात कर्जमाफीचा फायदा पश्‍चिम महाराष्ट्रालाच झाला होता. कर्जमाफी करून पुन्हा शेतकरी कर्जदार होणार नाही, याची हमी काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जलयुक्त कामाच्या चौकशी करा
काटोल, नरखेड तालुक्‍यात जलयुक्त शिवारच्या कामांवर 250 कोटी रुपये खर्च करूनही पाण्याची पातळी वाढलेली नसल्याचा आरोप करीत याची चौकशी करण्याची मागणी केली. यावर सभापती उकेश चव्हाण यांनी आक्षेप घेत, चिखले यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचा आरोप करीत, तालुक्‍यात जलयुक्त शिवाराचे कामे चांगली झाली आहे. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असल्याचे सांगून चौकशीची मागणी धुडकावून लावली.

सायकलचे पैसे सिमेंट रस्त्यात
समाजकल्याण विभागातर्फे अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना सायकल देण्यात येते. मागील वर्षी यासाठी 80 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र, एकाही विद्यार्थ्यास सायकल वाटप करण्यात आली नाही. यंदा 70 लाखांची तरतूद करण्यात आली. मात्र, जिल्हा परिषदेला एक कोटीच्यावर खरेदी करण्याचा अधिकार नसल्याने यंदा एक कोटीच्या सायकल वाटप करण्यात येणार असून उर्वरित 50 लाख रुपये सिमेंट रस्त्यांच्या कामासाठी वळता करण्यात आल्याचा खुलासा विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी केला. जिल्हा परिषदेच्या चुकीमुळे अनेक विद्यार्थी सायकलपासून वंचित राहणार आहेत.

अध्यक्ष, गोडबोले यांच्यात खडाजंगी
शिक्षकाच्या बदलीवरून जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर आणि शिवसेनेच्या सदस्या भारती गोडबोले यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. पदाचा दुरुपयोग करून शिक्षकाची बदली केल्याचा आरोप करीत अध्यक्ष आहात म्हणून काहीही कराल काय, असा सवाल गोडबोले यांनी केला. यावर अध्यक्ष चांगल्याच भडकल्या. सदस्यांनी सांभाळून बोलावे, ताशेरे ओढू नये, असे सांगून बदलीचे रेकार्डिंग सदस्यांना दाखविण्यासोबत या चौकशी करण्याचे निर्देश दिले.

गैरहजर शिक्षकावर मेहरनजर
नरखेड तालुका रामपूर गावातील शिक्षक राऊत गेल्या सहा वर्षांपासून गैरहजर असल्याचा मुद्दा हरणे यांनी उपस्थित केला. यावर सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी गेल्या सहा वर्षांपासून वेतन दिले नसल्याचे सांगून बडतर्फ करण्यास टाळाटाळ करीत पाठराखण केली. सहा वर्षे गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात न आल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्‍न उपस्थित होत आहे.

अभियंते कामासाठी घेतात टक्का
अभियंते कामासाठी दोन,तीन टक्के रक्कम ठेकेदारांकडून घेत असल्याचा मुद्दा कुंदा आमदरे यांनी उपस्थित केला. कनिष्ठ, उपअभियंता ठेकेदारांकडून कामासाठी टक्‍के घेतात, वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पैसे द्यावे लागतात, असे सांगून ते कामावर लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. हिवाळी अधिवेशनातही खर्च करावा, असेही ते म्हणाले. यावर बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशन करावे लागते, असे सांगून पळ काढला.

त्या डॉक्‍टर व ग्रामसेवकाला निलंबित करा
उपासराव भुते यांनी कुही तालुक्‍याअंतर्गत असलेल्या तारणा पीएससीच्या डॉ. फाये या कित्येक दिवसांपासून गैरहजर असल्याचा मुद्दा उपस्थित करीत निलंबनाची मागणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सवई यांनी सदरप्रकरणी चौकशी करून निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आश्‍वासन दिले. भुते यांनी मांढळ ग्रामपंचायतीचे प्रभारी ग्रामसेवक पुंड यांनी पथदिवे लावण्याकरिता 14 व्या वित्त आयोगातील जवळपास 15 लाखांच्या निधीचा भ्रष्टाचार केल्याचा मुद्दा उपस्थित करीत करून निलंबित करण्याची मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com