हॅपी ग्रीन डे!

हॅपी ग्रीन डे!

नागपूर - ‘मी पोपट आणला; तो उडून गेला. मी खारूताई आणली; ती पळून गेली. मग मी एक झाड लावले. मग पोपटही आला आणि खारूताईही आली.’ झाडांचे महत्त्व सांगणारा अत्यंत मार्मिक संदेश माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी चिमुकल्यांना दिला. हा अनमोल धडा उद्या (बुधवारी ५ जुलै) विदर्भातील शेकडो शाळांमध्ये विद्यार्थी गिरवणार आहेत. निमित्त आहे ‘सकाळ ग्रीन डे’ अभियानाचे.

पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे काम झाड करते. समस्त सजीवसृष्टीला प्रत्येक श्‍वास देणारा प्राणवायू झाडच उत्सर्जित करते. झाडे नसली तर तो भाग ओसाड होतो. पाऊस रुसतो. याशिवायही झाडे खूप काही देतात. सावली, फळे, फुले, लाकडासह जमिनीची धूपही थांबवते. झाडांचे माणसांशिवाय अडत नाही. पण, माणसांचे झाडाशिवाय नक्कीच अडते. मग आपण झाडांचा ‘डे’ सिलेब्रेट करतो का कधी? रोज डे, मदर्स डे, फादर्स डे करतो. त्या दिवसांचेही महत्त्व आहेच. परंतु, आपले आयुष्यच व्यापून उरणाऱ्या आणि एक नव्हे, तर शेकडो वर्षे आपल्याला काही तरी देतच राहणाऱ्या झाडांसाठी आपण कधी कोणता दिवस साजरा करीत नाही.

हॅपी ग्रीन डे!
‘सकाळ’ने हे हेरले आणि ‘ग्रीन डे’ साजरा करण्याचा संकल्प केला. विदर्भभरातील चिमुकल्यांनी साथ दिली आणि बघता बघता या निश्‍चयाचा महामेरू झाला. गोवर्धन काय एकट्याने उचलायचा असतो? मग शाळांचे संस्थापक, प्राचार्य आणि शिक्षकांनी साथ दिली आणि पाच जुलै ‘ग्रीन डे’ साकारला गेला. हा दिवस यापुढे दरवर्षी साजरा केला जावा. तो शासनानेही आपल्या अजेंड्यावर घ्यावा, यासाठी आपण शासनालाही साकडे घालूया. पण, आधी एक तरी झाडं लावूया. त्याला जगवूया. कुणीतरी, कधीतरी लावलेल्या एखाद्या झाडाच्या सावलीत आपण जसे बसतो ना तसेच आपणही कुणालातरी सावली देण्याचे काम करूया. मग पोपट काय, खारूताई काय... ते येतीलच. चला तर... हॅपी ग्रीन डे! 

लोगोचे ठिकठिकाणी अनावरण 
‘ग्रीन डे’ अभियानाच्या पार्श्‍वभूमीवर मान्यवरांच्या सहभागाचे ‘कॉफी विथ’ सकाळ कार्यक्रम विदर्भात विविध ठिकाणी आज झाले. ‘एक तरी झाड लावा’, ही प्रेरणा देणाऱ्या ‘सकाळ ग्रीन डे’च्या लोगोचे अनावरण शेकडो ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते झाले. विदर्भ आवृत्तीच्या नागपूर सकाळ मुख्यालयात लोगो अनावरणाचा मुख्य कार्यक्रम झाला. वनविभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. शेषराव पाटील यांनी अनावरण करून ‘ग्रीन डे’साठी विद्यार्थ्यांना संदेश आणि शुभेच्छाही दिल्या. यावेळी उपस्थित ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, युनिट हेड संजीव शर्मा.

‘सकाळ ग्रीन डे’ची शपथ
मी शपथ घेतो/घेते की, या सुंदर वसुधेवरील आमचे जीवन सुखकारक करणाऱ्या वृक्षांची लागवड आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी मी तन, मन, धनाने झटेन. सार्वत्रिक प्रदूषण आणि पर्यावरण ऱ्हासाच्या काळात या भूमीवरची हिरवाई वाढवणे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे हा उत्तम मार्ग आहे, यावर माझा ठाम विश्‍वास आहे. वृक्षांचे संगोपन आणि संरक्षण माझ्या आणि समस्त मानवजातीच्या अस्तित्वासाठी आवश्‍यक आहे, ही भावना सर्वांमध्ये रुजवण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करेन.

घोषवाक्‍य पाठवा
‘सकाळ ग्रीन डे’ या उपक्रमाद्वारे समाजातल्या वृक्षप्रेमाला जागे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येकाच्या मनातले हिरवे स्वप्न वृक्षांच्या अस्तित्वावर अवलंबून असते. हा उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भविष्यात ज्यांचा वापर करता येईल, अशी घोषवाक्‍ये लिहिण्याचे आवाहन सर्वांना करीत आहोत. घोषवाक्‍ये किंवा चारोळीच्या स्वरूपात वृक्षांचे माहात्म्य सांगणारा मजकूर ९१३००९७५११ या व्हॉट्‌सॲप क्रमांकावर पाठवावा. चांगल्या मजकुराला ‘सकाळ’मधून प्रसिद्वी मिळेल आणि उत्कृष्ट घोषवाक्‍य किंवा चारोळीला बक्षिसेही दिली जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com