निवासी इमारतीतील रुग्णालये होणार बंद

निवासी इमारतीतील रुग्णालये होणार बंद

नागपूर - निवासी इमारती, गाळ्यांमध्ये बाह्यरुग्ण सेवेच्या नावावर इतर गाळेधारकांना मनस्ताप देणारी रुग्णालये बंद होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेकडे यावर कारवाईसंबंधात कुठलेही अस्त्र नव्हते. सोमवारी सभागृहात आरोग्य समितीच्या बाह्य रुग्ण सेवा धोरणाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे महापालिकेला आता निवासी इमारतीत रुग्णालये उघडणाऱ्यांवर कारवाईचे अधिकारही मिळणार असून, हजारो फ्लॅटधारकांना दिलासा मिळणार आहे. 

निवासी इमारतींत रुग्णसेवा देणाऱ्यांसाठी धोरण ठरविण्याबाबत महापौर नंदा जिचकार यांनी निर्देश दिले होते. महिन्याभरात आरोग्य समिती बाह्यरुग्ण सेवेसंदर्भात (ओपीडी) धोरण तयार करा, असे त्यांनी प्रशासनाला सुनावले होते. १२ नोव्हेंबरला यासंदर्भात नव्या दर सुधारणेसह पाच बाबींचा धोरणात समावेश केला. या धोरणात माजी महापौर प्रवीण दटके यांनी २२ सूचना केल्या. 

या सूचनांसह बाह्यरुग्ण सेवा धोरण सोमवारी मंजुरीसाठी सभागृहात आले. दटके यांनी आरोग्य समितीचे धोरणाला सूचनेसह मंजुरीची मागणी केली. सध्या आरोग्य विभाग नाममात्र शुल्कावर निवासी इमारतींच्या आत वैद्यकीय सेवेस परवानगी देते. त्यामुळे रुग्णांना सेवा देण्याच्या आड डॉक्‍टरांकडून त्या इमारतींचा मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरू आहे. ‘भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी’ या म्हणीप्रमाणे डॉक्‍टरांकडून संपूर्ण इमारतीवरच नियंत्रण असल्याचे चित्र आहे. कारवाईचे कुठलेही ठोस अधिकार मनपाला नाही. एमआरटीपी कायद्यातही कारवाईसाठी स्पष्टता नाही. शिवाय, विकास नियमावलीतही इमारतीतील अशा सेवांवर बंधने आणण्याचा उल्लेख नाही. त्यामुळे आरोग्य विभाग हतबल होते. 

नागपूरकरांच्या वाढत्या तक्रारी
पीसीपीएनडीटी कायद्यान्वये नर्सिंग ॲक्‍टनुसार नोंदणीकृत असलेल्या डॉक्‍टर्सला इमारतीच्या आत बाह्यरुग्ण सेवा देण्यास मोकळे रान आहे. त्यामुळे शहरातील हजारो फ्लॅटधारक त्रस्त आहेत. कर्ज काढून खरेदी केलेल्या फ्लॅटमध्येही त्यांना मोकळेपणा राहण्याचा आनंद फ्लॅटधारकांना घेता येत नसल्याचे धक्कायदायक चित्र आहे.
नागपूरकरांच्या वाढत्या तक्रारी, अशा वैद्यकीय व्यवसायांमुळे गाळेधारकांच्या आरोग्य व निवासी हक्कावर येणारी गदा लक्षात घेता बाह्य रुग्ण सेवा करण्यासंदर्भातील धोरण आखण्याची विनंती केली होती. नगरसेवक धर्मपाल मेश्राम यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. सोमवारच्या महासभेत आरोग्य समितीच्या कार्यवृत्त अहवाल व धोरण प्रस्तावाचे कार्यवृत्त अहवाल दटके यांच्या सूचनांसह महापौरांनी कायम करण्याचा निर्णय दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com