दिव्यांग शुभम खेळासोबतच परीक्षेतही अव्वल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

नागपूर - आईवडील जन्मापासूनच मूकबधिर. त्यामुळे त्यांनी कधीही बाहेरचा  किलबिलाट ऐकला नाही. मात्र, आपल्या मुलाला हा आनंद मिळावा, अशी पालकांची दाट इच्छा होती. परंतु, मुलगाही जन्मापासूनच मूकबधिर असल्याने त्यालाही समोरच्याचे बोलणे ऐकता  आले नाही. मोठा झाल्यानंतर त्याने आपल्या कर्तृत्वाने केवळ शिक्षणातच नव्हे क्रिकेटच्या मैदानावरही बाजी मारली. 

नेतृत्वाच्या बळावर त्याने आपल्या शाळेला जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत ‘चॅम्पियन’ बनविले. यशाचा जल्लोष त्याने पाहिला व अनुभवला खरे, परंतु सहकारी खेळाडूंचे अभिनंदनाचे बोल तो ऐकू शकला नाही. मात्र, एखादी गोष्ट आपल्याकडे नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा, जे आहे त्यातच आयुष्याचा आनंद लुटणाऱ्या शुभम भोयरने समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे. खोडे मूकबधिर विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या शुभमने बारावीच्या परीक्षेत महाविद्यालयात अव्वल स्थान पटकावून आपल्यातील अष्टपैलूत्व सिद्ध करून दाखविले. त्याने बारावीच्या परीक्षेत ६३.२३ टक्के गुणांसह प्रथम स्थान पटकाविले. वर्धा येथील रहिवासी शुभमच्या कुटुंबातील सर्वच सदस्य मूकबधिर आहेत, असे विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कमल वाघमारे यांनी सांगितले.

बारावीच्या परीक्षेत शुभमसह विद्यालयाच्या मुरली लांजेवारने ६२ टक्के गुणांसह द्वितीय आणि प्रियांका प्रसादने ६१ टक्के गुणांसह तृतीय स्थान पटकाविले. खोडे विद्यालयाचा १०० टक्के निकाल दिला. गेल्या सात आठ वर्षांपासून विद्यालयाची शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे योग्य नियोजन आणि त्यांचा नियमित सराव, यामुळेच हे यश मिळविता आले. विद्यार्थी ‘विशेष’ असल्याने त्यांच्या सहज लक्षात राहत नाही, त्यामुळे अधिक मेहनत घ्यावी लागली, असेही त्यांनी सांगितले. भविष्यात या विद्यार्थ्यांनी औद्योगिक शिक्षणाकडे लक्ष द्यावे, ज्यामुळे त्यांना स्वत:ची व कुटुंबाची जबाबदारी उचलता येईल, असेही प्राचार्य वाघमारे म्हणाल्या.