गुन्हेगार ‘आयएसएस’च्या रडारवर

गुन्हेगार ‘आयएसएस’च्या रडारवर

नागपूर - नागपूर रेल्वेस्थानकावर इंटिग्रेटेड सिक्‍युरिटी सिस्टिम (आयएसएस) अंतर्गत अत्याधुनिक स्वरूपाची सीसीटीव्ही यंत्रणा उभारली जात आहे. त्याद्वारे रेल्वेस्थानकावरील प्रत्येक संशयास्पद हालचालीवर २४ बाय ७ करडी नजर राहणार आहे. रेल्वेस्थानकांवर नियमित गुन्हेगारी कारणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या कुंडल्याच या यंत्रणेत फीड करण्यात येईल. त्यामुळे आरोपी कॅमेऱ्यांच्या टप्प्यात येताच रेल्वे सुरक्षा दलाला सूचना मिळेल आणि त्यांचा तातडीने बंदोबस्त करणे शक्‍य होईल.

टीम ‘सकाळ’ने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून नागपूर रेल्वेस्थानकावरील सुरक्षाव्यवस्थेचे वाभाडे काढल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दल अचानक सक्रिय झाले. सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात आल्या. एक एक करीत बहुतेक इल्लिगल एंट्रीज बंद झाल्या. अनेक वर्षांपासून रखडलेल्या इंटिग्रेटेड सिक्‍युरिटी सिस्टिम कार्यान्वित करण्याला प्राधान्य देण्यात आले. तातडीने निविदा प्रक्रिया राबवून नवी दिल्लीच्या कंपनीला कंत्राट देण्यात आले. निविदेतील अटीनुसार, अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या खरेदीसाठी वेळ लागत असला तरी ऑक्‍टोबरपर्यंत प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्याचा प्रयत्न आहे. 

सराईत गुन्हेगारांच्या छायाचित्रासह संपूर्ण माहिती, सवई आणि गुन्ह्याच्या पद्धतीसंदर्भात इत्थंभूत माहिती या यंत्रणेत पूर्वीच फीड केली जाणार आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडे गुन्हेगारांची मोठी यादी आहे. त्यातील सराईत गुन्हेगार, टोळीने चोऱ्या करणाऱ्यांची माहिती प्राधान्यक्रमाने फीड राहील. याशिवाय विविध सुरक्षायंत्रणा आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीनेही कुख्यात गुन्हेगारांची माहिती घेऊन ती यंत्रणेत समाविष्ट करण्यात येईल. या अत्याधुनिक यंत्रणेत पूर्वीच छायाचित्र असलेला गुन्हेगार कॅमेऱ्यांच्या टप्प्यात येताच सायरन वाजून रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना माहिती मिळेल. यानंतर त्यांच्या हालचालींवर बारीक वॉच ठेवणे शक्‍य होईल.

नियंत्रणासाठी  स्वतंत्र कर्मचारी 
इंटिग्रेटेड सिक्‍युरिटी सिस्टिम अधिक परिणामकारक होऊन गुन्हेगारी कारवायांना  आळा बसावा, यादृष्टीने संपूर्ण यंत्रणा हाताळण्यासाठी स्वतंत्र कर्मचारीवर्गाची नियुक्ती करण्यात येईल. पण, नवीन पदे मिळणार नसल्याने रेल्वे सुरक्षा दलाने अस्तित्वातील काही कर्मचाऱ्यांची पदे निरस्त करून निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव दिला आहे. सध्या नागपूर विभागात एकच निरीक्षक आहे. पण, प्रस्तावानुसार दोन अतिरिक्त निरीक्षक मिळणार आहे. त्यातील एकाची नियुक्ती इंटिग्रेटेड सेक्‍युरिटी सिस्टिम हाताळण्यासाठी करण्यात येणार असून, नरखेड येथे नवीन ठाणे सुरू करून दुसऱ्या निरीक्षकाची नियुक्ती करण्याचा विचार आहे.

२०० अत्याधुनिक कॅमेरे लागणार
इंटिग्रेटेड सेक्‍युरिटी सिस्टिमअंतर्गत अत्याधुनिक पद्धतीचे ३६० डिग्री फिरणारे २०० हून अधिक कॅमेरे लावण्यात येणार आहेत. रेल्वेस्थानकाचा कोपरान्‌कोपरा कॅमेऱ्याच्या टप्प्यात राहील, अशा पद्धतीने त्यांची रचना राहील. सर्वच कॅमेरे हाय रिझॉलेशन आणि नाईट व्हिजन असलेले राहतील. कितीही झूम केले तरी चित्रात स्पष्टता राहणार आहे. यामुळे गुन्हेगारांसोबतच प्रत्येक संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे शक्‍य होईल.  

स्वतंत्र सर्व्हर रूमची निर्मिती
सध्या रेल्वेस्थानकावर ४० हून अधिक कॅमेरे असले तरी बराच भाग कॅमेऱ्यांच्या टप्प्याबाहेर आहे. शिवाय हे कॅमेरे कालबाह्य ठरले आहे. याचा लाभ गुन्हेगार, चोरटे आणि अनधिकृत विक्रेते घेतात. नव्या यंत्रणेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी स्वतंत्र सर्व्हर रूमची निर्मिती करण्यात येणार आहे. तेथूनच संपूर्ण यंत्रणा हाताळली जाणार आहे.

इंटिग्रेटेड सिक्‍युरिटी सिस्टिमअंतर्गत लागणारी सीसीटीव्ही यंत्रणा हाताळण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या यंत्रणेत सराईत गुन्हेगारांची माहिती फीड करण्यात येईल. रेल्वे सुरक्षा दलाकडे गुन्हेगारांची मोठी यादी आहे. शिवाय अन्य यंत्रणा व शहर पोलिसांच्या समन्वयातून गुन्हेगारांबाबतची माहिती मिळविण्यात येईल.
ज्योतिकुमार सतिजा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com