ट्रम्प कन्येच्या स्वागतासाठी महाराष्ट्राची तुतारी

ट्रम्प कन्येच्या स्वागतासाठी महाराष्ट्राची तुतारी

नागपूर - हैदराबाद येथे आयोजित ग्लोबल इकॉनॉमिक समिटमध्ये जगभरातील प्रतिनिधी सहभागी होणार असले तरी डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका हिची उपस्थिती आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. स्वागत सोहळ्यात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या नेतृत्वात पंधरा मिनिटांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून यामध्ये सांगलीची तुतारी आणि धनगरी गजा हे लोकनृत्य महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

नीती आयोगातर्फे हे शिखर संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात देशाच्या संस्कृतीचे चित्र उभा करणारा पंधरा मिनिटांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची जबाबदारी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे होती. नागपुरातील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या अखत्यारित महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटकसह आता गोवा आणि तेलंगणादेखील जोडले गेले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या सूचना केंद्राला देण्यात आल्या. त्यानंतर दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने देशभरातील १५० कलावंतांचे नृत्य पाहुण्यांपुढे सादर करण्याचा निर्णय घेतला.

देशभरातील विविध लोकनृत्यांचा कोलाज आणि त्याला पारंपरिक वाद्यांची जोड, असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. दिल्लीचे नृत्य दिग्दर्शक बंसी कौल यांच्या मार्गदर्शनात याची तयारी करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील धनगरी गजा या लोकनृत्याचाही समावेश करण्यात आला आहे. कारू शंकर कोलेकर, काशी अप्पा कोलेकर, येलप्पा कोलेकर आणि तुळशीराम कोलेकर नृत्य सादर करणार आहेत. सांगलीतील आनंद कोलेकर, विनायक गुरव आणि जगन्नाथ गुरव या कलावंतांची तुतारी वादक म्हणून निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प यांच्यापुढे सादरीकरणाची संधी मिळत असल्याने कलावंतांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, असे केंद्राचे अधिकारी प्रेमस्वरूप तिवारी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. देशभरातील कलावंत शुक्रवारी (ता. २४) हैदराबादमध्ये दाखल होतील. शनिवारपासून तालमीला सुरुवात होईल, असेही सांगण्यात आले. केंद्राचे प्रशासकीय अधिकारी सुदर्शन पाटील, गणेश थोरात यांच्यासह इतर काही कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com