वर्ध्याच्या तरुणाचे यकृत पुण्याला

वर्ध्याच्या तरुणाचे यकृत पुण्याला

नागपूर - सोमवारी सकाळी साडेदहाची वेळ. सायरन वाजवत वाऱ्यापेक्षाही तेज वेगात अवघ्या २२ वर्षे वयाच्या तरुणाचे यकृत घेऊन निघालेली ॲम्बुलन्स चार मिनिटांत नागपूर विमानतळावर पोहचली. विमानतळावर प्रतीक्षेत असलेले ‘इंडिगो’ ‘यकृत’ पेटीसह पुण्याच्या दिशेने झेपावले. पुण्यातील एका युवकाला या यकृत दानातून जीवनदान मिळाले. नागपुरातील दोघांना किडनीदानातून जीवनदान दिले. काळजाचा तुकडा गेल्याचे दुःख बाजूला सारत त्या आईने अवयवांच्या प्रतीक्षेतील तिघांना जीवदान देण्याचे अनमोल असे काम केले. मातेच्या या त्यागाला तोड नसल्याचे सांगताना वोक्‍हार्टमधील डॉक्‍टरांचेही डोळे पाणावले. त्या मातेला सलाम करण्यासाठी आपोआपच हात वर जातात, अशीच ही घटना आहे.  

सोमवारी दुपारी हे प्रत्यारोपण यशस्वी झाल्याची माहिती पुढे आली. महिनाभरात वोक्‍हार्ट ते विमानतळ असे तीनवेळा ग्रीन कॉरिडोर तयार करून वाहतूक थांबवण्यात आली. उपराजधानीलाही आता अवयवदानाचा माणुसकी धर्म निभावण्याची सवय झाली आहे. 

वर्धा येथील संजय (नाव बदललेले)चा नागपूरच्या रस्त्यावर अपघात झाला. उपचारादरम्यान ब्रेन डेड (मेंदू मृत) झाल्याचे सांगण्यात आले. संजयने कोल्हापूर येथून केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी नागपुरात आला होता. बुधवारी सकाळी मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना अमरावती मार्गावरील एलआयटी चौकात अपघात झाला. संजयच्या डोक्‍याला दुखापत झाली. उपचारादरम्यान त्याचा मेंदू मृत्यू असल्याचे निदान झाले. रविवारी नातेवाइकांना माहिती दिली. दरम्यान, समुपदेशनानंतर नातेवाइकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. विभागीय अवयवदान प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. रवी वानखेडे, डॉ. विभावरी दाणी यांच्याशी संपर्क साधला. 

आईच्या काळजावर घाव...
अपघातामध्ये मेंदूमृत्यू झालेल्या तरुण मुलाचा देह या मातेला बघवत नव्हता. लेकराला बघताना निःशब्द होती ती माता. त्या आईच्या काळजावर काळाने घाव घातला. संजयची आई परिचारिका. यामुळे शेकडो नातेवाइकांवर असे दुःख कोसळल्याचे प्रसंग नवीन नाही. परंतु आपल्या काळजाचा तुकडा अचानक निघून जाण्याच्या वेदना ती आई अनुभवत होती. अवयवदानानंतर एक किडनी ऑरेंजसिटी रुग्णालयातील तर एक वोक्‍हार्ट रुग्णालयात प्रतीक्षा यादीतील किडनीग्रस्ताला देण्यात येईल. डोळे माधव नेत्रपेढीला दिले. हृदय हेलावणारा हा प्रसंग या दुःखाने माखलेल्या या परिसरात सारेच नातेवाईक अनुभवत होते. 

अवयवांच्या प्रतीक्षा यादीनुसार पुणे येथील रुबी रुग्णालयात एक तरुण यकृताच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती प्राप्त झाली. रुबी रुग्णालयाचे यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. कमलेश बोकिल  आणि त्यांचे पथक सोमवारी सकाळीच वोक्‍हार्ट येथे दाखल झाले. सकाळी वोक्‍हार्ट रुग्णालयाने ‘ऑर्गन रिट्रायव्हल’ची तयारी केल्यानंतर नागपूर पोलिसांशी संपर्क साधून ग्रीन कॉरिडॉर तयार केला. नेफ्रोलॉजिस्ट डॉ. संजय कोलते, डॉ. सुजित हाजरा, डॉ. सूर्यश्री पांडे, बधिरीकरणतज्ज्ञ  डॉ. निशांत वानखेडे, डॉ. स्वानंद नेलंग, डॉ. अवंतिका जयस्वाल यांच्या वैद्यकीय पथकाने सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com