मुख्यमंत्री म्हणाले, ‘डर के आगे जीत हैं!’

मुख्यमंत्री म्हणाले, ‘डर के आगे जीत हैं!’

नागपूर - मोठेपणी तुला काय व्हायचं आहे, असा प्रश्‍न सहसा मुलांना विचारला जातो. परंतु, लहानपणी तुम्हाला काय व्हावं, असं वाटत होतं, असा प्रश्‍न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी (ता. १६) चिमुकल्यांनी विचारला. त्यावर ‘लहानपणी मला मोठं व्हावसं वाटत होतं’ असं उत्तर देऊन मोठं होण्यासाठी ‘डर के आ जीत है’ असा कानमंत्र मुख्यमंत्र्यांनी मुलांना दिला.

राजाराम वाचनालयाच्या वतीने आयोजित बाल साहित्य संमेलनात बालसाहित्यिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते व भुपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत घेतली. पांडे ले-आउट येथील सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष गोविंद गोडबोले, मुख्य संयोजक मुकुंद नानिवडेकर यांची उपस्थिती होती.

हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्‍नांना उत्तर देण्यात व्यस्त असलेले मुख्यमंत्री चिमुकल्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देताना मात्र रिलॅक्‍स होते. 

दिविजाच्या दमलेल्या बाबांची कहाणी काय आहे, या प्रश्‍नावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी तिला फार वेळ देऊ शकत नाही. पण, ती तक्रारही करत नाही. कारण मी कुठल्या कामात व्यस्त आहे, हे तिला माहिती आहे.’

चॉकलेट्‌स आवडतात का, या प्रश्‍नावर मात्र मुलांना अनपेक्षित उत्तर मिळाले. ‘मलाही चॉकलेट्‌स आवडतात आणि त्यासाठी माझे व दिविजाचे भांडणही होत असते. मी तिला चॉकलेट देण्याऐवजी तीच मला देते,’ असे मुख्यमंत्री म्हणाले आणि जोरदार हशा पिकला. चांदोबा, फॅन्टम, चाचा चौधरी ही कॉमिक्‍स मी लहानपणी वाचायचो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लहानपणी नाटकात काम केले. त्याची तालीम राजाराम वाचनालयात व्हायची, अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली.

हेलिकॉप्टर वारंवार का बिघडतं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर बिघडण्याचे प्रसंग आता कुणासाठीही नवे राहिलेले नाहीत. आज लहान मुलांनीसुद्धा याचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ‘काका, तुमचं हेलिकॉप्टर वारंवार का बिघडतं?’ या प्रश्‍नावर स्वतः मुख्यमंत्र्यांना हसू आवरलं नाही आणि ‘त्याचं रहस्य मलासुद्धा कळलेलं नाही. ते एकदा कळलं की हेलिकॉप्टर बिघडू देणार नाही’, या उत्तराने त्यांनी समाधान केले.

गडकरी दंगा करायचे!
लहानपणी तुम्ही शाळेत अभ्यास करायचे की दंगा-मस्ती करायचे, या प्रश्‍नावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ‘मी शाळेत दंगा-मस्तीच जास्त करायचो’ असे उत्तर दिले आणि सभागृहात जोरदार हशा पिकला. नेतृत्व गुणांसाठी काय केले, या प्रश्‍नावर ‘काहीही प्रयत्न केले नाहीत. सुरुवातीपासून आजपर्यंत जसे सुरू आहे तसेच चालले आहे’ अशी मिश्‍किली गडकरींनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com