समाजातील धुरिणांना ‘सकाळ’चा मानाचा मुजरा 

समाजातील धुरिणांना ‘सकाळ’चा मानाचा मुजरा 

नागपूर - सामाजिक कार्याचा वसा घेऊन वंचितांची सेवा करीत कर्तबगारीचे शिखर गाठणाऱ्या समाजातील धुरिणांचा त्याच ताकदीने समाजहिताला प्राधान्य देत आपले वेगळेपण सिद्ध करणाऱ्या ‘सकाळ’ने आज हजारोंच्या उपस्थितीत गौरव केला. निमित्त होते ‘सकाळ’ विदर्भ आवृत्तीच्या पंधराव्या वर्धापनदिनाचे. राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शिक्षण, सांस्कृतिक, पर्यावरण क्षेत्रातील लखलखते तारे, विचारवंतांच्या टाळ्यांच्या गजराने सत्कारमूर्तींचे चेहरेही आनंदाने प्रफुल्लित झाले. 

‘सकाळ’ विदर्भ आवृत्तीच्या पंधराव्या वर्धापनदिनानिमित्त सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात दीनदुबळ्यांसाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती, खेळाडू, साहित्यिक, गायन, वैद्यकीय, कृषी क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्यांचा ‘सन्मान सोहळा’ रंगला. या सोहळ्याला आनंदवन परिवाराचे प्रमुख डॉ. विकास आमटे प्रमुख पाहुणे म्हणून तर विशेष अतिथी म्हणून निर्मल उज्ज्वल समूहाचे प्रमुख प्रमोद मानमोडे, सुप्रसिद्ध उद्योजक व ओसीडब्ल्यूचे प्रमुख अरुण लखानी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर विदर्भ आवृत्तीचे युनिट हेड संजीव शर्मा, कार्यकारी संपादक शैलेश पांडे उपस्थित होते. आदिवासीबहुल भागात असंख्य मनांना उभारी देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करीत समाजाला योगदान देणारे डॉ. विकास आमटे, उद्योगासोबत सामाजिक कार्यातूनही वेगळेपण जपणारे अरुण लखानी, नेटाने वेगवेगळ्या उपक्रमांतून समाजकार्याला सदैव प्राधान्य देणारे प्रमोद मानमोडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन समाजातील धुरिणांचा गौरव करण्यात आला. यात गरिबांच्या शिक्षणासाठी २६ वर्षांपासून कार्य करणारे काकाजी हट्टेवार, झोपडपट्टीतील मुलांना संस्कारक्षम शिक्षणाचे धडे देण्याचे कार्य करणाऱ्या शुभांगी पोहरे, असंख्य रोजगार मेळावे तसेच दीड हजारांवर गरिबांच्या मोफत शस्त्रक्रिया करणारे डॉ. देवेंद्र गणवीर, स्वतःची शेती विकून निराधार वृद्धांना गेल्या २० वर्षांपासून मायेची ऊब देणारे शेषराव डोंगरे, सायकलवर वस्तू विकण्यापासून सुरुवात करीत आता स्वतःच्या स्नोवी सॅनिटरी पॅड्‌सची देश-विदेशात विक्री करणारे उद्योजक अमित वैद्य, एकाच दिवसांत चार पेटंट नोंदवून आइनस्टाइन, न्यूटन, एडिसन या महान शास्त्रज्ञांच्या पंक्तीत मान मिळविणारे पेटंटचे विक्रमवीर अजिंक्‍य कोट्टावार, पर्यावरणस्नेही डॉ. सचिन पावडे, एसटीमध्ये गर्भवतीची सुखरूप प्रसूती करणाऱ्या वाहक करुणा गोंडाणे, गझल गायनात भरारी घेतल्यानंतर ही कला इतरांना शिकविणारे गझलगायक डॉ. राजेश उमाळे, तरुणाईत सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे प्रचित अरविंद पोरेड्डीवार, स्वच्छतादूत तसेच साहित्यनिर्मितीमुळे गावाकडील बहिणाबाई अशी प्रतिमा असलेल्या संगीता धोटे, लेखन, दिग्दर्शन, अभिनयाच्या माध्यमातून ३० वर्षे झाडीपट्टी रंगभूमीवर यशस्वीपणे वावर असलेले देवेंद्र लुटे, विद्यार्थ्यांतील गणिताची भीती दूर करणाऱ्या गणितज्ञ सुषमा सराफ, प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत हॅंडबॉलमध्ये जागतिक स्तरावर ठसा उमटविणारी पूनम कडव यांचा समावेश होता. 

यावेळी भोजवानी फूड्‌स लिमिटेडच्या माध्यमातून आरोग्यवर्धक फूड्‌सची संकल्पना राबविणारे आकाश भोजवानी सोहळ्याला उपस्थित राहू न शकल्याने त्यांच्या कार्याचाही शब्दसुमनांनी गौरव करण्यात आला. ‘सकाळ’ने केलेल्या या गौरव सोहळ्यात राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शिक्षण, सांस्कृतिक, पर्यावरण क्षेत्रातील लखलखते तारे, विचारवंतांनी टाळ्यांच्या गजरात कार्याला सलाम केल्याने या समाजधुरिणांनाही भविष्यातील कार्यासाठी प्रोत्साहन मिळाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्रास्ताविक कार्यकारी संपादक शैलेश पांडे यांनी केले. संचालन आसावरी गलांडे-देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमाला निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑप. सोसायटी व ओसीडब्ल्यू सहयोगी प्रायोजक होते तर राधिकाताई पांडव चॅरिटेबल ट्रस्ट सहप्रायोजक होते. 

पूजा बनली वडिलांचा आवाज 
यावेळी निर्मल उज्ज्वल समूहाचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांना प्रकृतीमुळे बोलणे शक्‍य झाले नाही. ‘सकाळला शुभेच्छा’ एवढेच ते बोलले. मात्र, त्यांची कन्या पूजाने पुढाकार घेऊन वडिलांचे मनोगत व्यक्त केले. तिने निर्मल परिवाराचे एक लाख सदस्य असून ते ‘सकाळ’चे वाचक असल्याचे नमूद केले. ‘सकाळ’च्या प्रोत्साहनामुळे सामाजिक कार्यात मदत होत असल्याचेही ती म्हणाली. 

मुख्यमंत्र्यांच्या वतीने ओएसडी भारतीय उपस्थित
वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने ओएसडी श्रीकांत भारतीय उपस्थित होते. त्यांनी ‘सकाळ’ने केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यापुढेही ‘सकाळ’चे हे व्रत अव्याहतपणे सुरू राहावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

इलेक्‍ट्रॉनिक, सोशल मीडियाच्या काळात जबाबदार मीडिया म्हणून प्रिंट मीडियाचे स्थान अबाधित आहे. यात ‘सकाळ’चे योगदान मोठे आहे. आज ‘सकाळ’चा पंधरावा वर्धापनदिन आहे. पंधरा वर्षे हा काळ मोठा असून यशस्वीपणे वाटचालीसाठी अभिनंदन. बदलत्या काळात प्रिंट मीडियाची जबाबदारी ‘सकाळ’ घेत आहे. ‘सकाळ’ने बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा. 
- अरुण लखानी, उद्योजक व ओसीडब्ल्यूचे प्रमुख. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com