सावरबांधे ले-आउटमधील हत्याकांडाचा पर्दाफाश

सावरबांधे ले-आउटमधील हत्याकांडाचा पर्दाफाश

नागपूर - सौभाग्यनगर, सावरबांधे ले-आउटमधील हत्याकांडाचा पर्दाफाश करण्यात हुडकेश्‍वर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी गुजरातमध्ये सापळा रचून पत्नीसह पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मारेकऱ्याच्या मुसक्‍या आवळल्या. विलास मिसाळ (५२) रा. सौभाग्यनगर असे मृताचे, तर सुनील ऊर्फ कालू गाडकिया (२५) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 

मूळचा गुजरात राज्यातील केराळा गावचा रहिवासी असलेला आरोपी कामाच्यानिमित्ताने पत्नीसह सौभाग्यनगरातच वास्तव्यास होता. मृतक घरी एकटाच असायचा. त्यामुळे रोजच रात्री त्याच्याकडे बैठका रंगायच्या. ११ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या बैठकीनंतर विलास याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आली. हुडकेश्‍वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला. मृताच्या बैठकीतील कालू हा घटनेच्या दिवसापासून पत्नीसह गुजरातला मूळगावी निघून गेल्याची माहिती तपासात पुढे आली. पोलिसांनी तत्काळ त्याचे गाव गाठले असता पत्नीने आरोपीची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. यानंतर गावातील नागरिकांना विश्‍वासात घेत पोलिसांनी कालूबाबत माहिती कळविण्याची विनंती केली. त्यातून कालू हा पत्नीसह मध्यप्रदेशात निघून जाणार असल्याची माहिती पुढे आली. दरम्यान, पोलिसांनी गावातून निघून गेल्याचा बनाव केला. मात्र, ते गावाच्या आजूबाजूलाच दबा धरून बसले होते. कालू पत्नीला घेण्यासाठी येताच पोलिसांनी झडप टाकून त्याला अटक केली. चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली. 

‘त्या’ युवकाची हत्याच
सोनेगाव हद्दीतील शिवणगाव, कलकुही नाल्याच्या बाजूला ८ नोव्हेंबर रोजी युवकाचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आला होता. मृताच्या डोक्‍यावर दगडाचे घाव दिसत असल्याने हे हत्येचे प्रकरण असण्याची शक्‍यता प्रारंभीपासूनच वर्तविण्यात येत होती. सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला. एक एक धागा जुळवत पोलिसांनी मृताची ओळख पटविली. वासुदेव डफ (३६) रा. मांढळ, कुही असे मृताचे नाव आहे. तपासात अज्ञात व्यक्तीने डोक्‍यावर दगड मारून वासुदेवची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com