एमबीबीएसला ॲडमिशनच्या नावावर फसवणूक

Money
Money

नागपूर - दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला ॲडमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून पालकांना लाखोंनी लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी शनिवारी पर्दाफाश केला. नागपुरात मेट्रोच्या सहायक अभियंत्याला या टोळीने १६ लाखांनी लुटले. या टोळीतील बापलेकासह तिघांवर सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मेट्रोमध्ये सहायक अभियंता असलेले प्रवीण श्‍यामराव समर्थ (५२, रा. प्रियदर्शिनी कॉलनी, सिव्हिल लाइन्स) यांना मुलीची ॲडमिशन एमबीबीएसला करायची होती. शासकीय वैद्यकीय कॉलेजमध्ये नंबर न लागल्यामुळे त्यांनी खासगी महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे ठरविले. मुख्य आरोपी विक्रांत दिनेश गेडाम (३०, प्लॉट नं. ११, रामनगर) याने समर्थ यांची भेट घेतली. त्यांना सावंगी मेघे येथील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये मुलीची एमबीबीएसला ॲडमिशन करून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी जवळपास २० लाख रुपये खर्च येणार असल्याचे आरोपीने सांगितले. समर्थ यांनी मुलीच्या भविष्यापोटी पैसे देण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी पहिला टप्पा म्हणून विक्रांतला १० लाख रुपये दिले.

विक्रांतने त्याचे वडील दिनेश गेडाम आणि काका उमेश गेडाम यांना मेडिकल कॉलेजचे कर्मचारी असल्याची ओळख समर्थ यांना करून दिली. त्यानंतर तिघांनी मिळून कॉम्प्युटरवर प्रवेश मिळाल्याचे पत्र तयार केले. ते पत्र समर्थ यांना दिले. त्यांनाही मुलीचा नंबर मेडिकल कॉलेजला लागल्याची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी आणखी पाच लाख ८५ हजार रुपये विक्रांतला दिले. त्याने ते पैसे घेऊन पोबारा केला. समर्थ यांनी प्रवेशपत्र घेऊन मेडिकल कॉलेज गाठले असता ते प्रवेशपत्र बनावट असल्याचे लक्षात आले. त्यावरून त्यांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

अन्य विद्यार्थिनींचीही फसवणूक
समर्थ यांना गंडा घातल्यानंतर या टोळीने सुनीता गजानन कात्रे या मुलीलाही एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्या मुलीच्या वडिलांकडूनही पहिला टप्पा म्हणून साडेसहा लाख रुपये उकळले. तिला वॉट्‌सॲपवर दत्ता मेघे प्रबोधन संस्थानचे शिफारसपत्र पाठवले. तिचाही विश्‍वास बसला. मात्र, उर्वरित पैसे देण्यापूर्वीच या टोळीचा भंडाफोड झाला. टोळीने आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना लुटल्याची माहिती समोर येत आहे.

वडील, काकाला दिले ट्रेनिंग
टोळीचा म्होरक्‍या विक्रांत याने वडील दिनेश गेडाम याला मेडिकल कॉलेजचा मुख्य लिपिक बनवले, तर काका उमेश गेडाम याला कॉलेजचा चतुर्थश्रेणी कर्मचारी बनवले. त्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांशी कसे बोलावे, याचे प्रशिक्षण दिले. टोळीत आणखी काही जणांचा समावेश आहे. टोळीवर वर्धा पोलिस ठाण्यामध्येही गुन्हे दाखल आहेत. वर्धा पोलिसांनी मुख्य आरोपी विक्रांत गेडामला अटक केली असून, तो वर्धा जिल्हा कारागृहात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com