मेट्रोची "ट्रायल रन' अनुभवणार दिव्यांग, अनाथ मुले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

नागपूर - शहराच्या इतिहासात आणखी एका सुवर्ण अध्यायासाठी मेट्रो रेल्वे सज्ज झाली आहे. दसऱ्याला मेट्रो रेल्वे मिहान डेपोतून सीमोल्लंघन करणार आहे. खापरी येथील दक्षिण विमानतळ परिसरापर्यंत 5.04 किमी अंतर मेट्रो रेल्वे धावणार असून, "ट्रायल रन' प्रत्यक्ष बघण्यासाठी दिव्यांग व अनाथ मुलांसोबत खापरीतील शाळेतील विद्यार्थ्यांनाही महामेट्रोने आमंत्रित केले आहे. 

नागपूर - शहराच्या इतिहासात आणखी एका सुवर्ण अध्यायासाठी मेट्रो रेल्वे सज्ज झाली आहे. दसऱ्याला मेट्रो रेल्वे मिहान डेपोतून सीमोल्लंघन करणार आहे. खापरी येथील दक्षिण विमानतळ परिसरापर्यंत 5.04 किमी अंतर मेट्रो रेल्वे धावणार असून, "ट्रायल रन' प्रत्यक्ष बघण्यासाठी दिव्यांग व अनाथ मुलांसोबत खापरीतील शाळेतील विद्यार्थ्यांनाही महामेट्रोने आमंत्रित केले आहे. 

शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या मेट्रो रेल्वेची जमिनीवरील ट्रॅकवर येत्या 30 सप्टेंबर रोजी "ट्रायल रन' घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते, परिवहनमंत्री नितीन गडकरी मेट्रो रेल्वेच्या "ट्रायल रन'ला हिरवी झेंडी दाखविणार आहे. मेट्रो रेल्वेच्या ट्रायल रनसाठी बुलंद इंजिन तसेच मेट्रो कोचेसही आणण्यात आले आहे. मिहान डेपो परिसरात ट्रायल रनसाठी गेल्या दोन महिन्यांपासून महामेट्रोचे तांत्रिक अधिकारी 24 तास परिश्रम घेत आहेत. मिहान ते खापरी दक्षिण विमानतळापर्यंत बुलंद इंजिनच्या साहाय्याने जमिनीवरील ट्रॅकची यशस्वी तपासणी करण्यात आली. यानंतर लखनऊ येथील आरडीएसओच्या पथकानेही ट्रॅक, ओव्हर हेड इलेक्‍ट्रिक लाइन, मेट्रो डब्यांची तांत्रिक तपासणी पूर्ण केली. आरडीएसओने ट्रायल रनसाठी मंजुरी दिल्यानंतर 30 तारखेला पहिल्यांदा इलेक्‍ट्रिकवर मेट्रो रेल्वे पाच किमी अंतर धावणार आहे. मेट्रो रेल्वे इलेक्‍ट्रिकवर धावताच शहराच्या इतिहासाला आणखी एक सुवर्ण अध्याय जोडला जाणार आहे. मेट्रो रेल्वेचे ट्रायल रन बघण्याची संधी दिव्यांग, अनाथ मुलांसह परिसरातील शाळांतील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. या मुलांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्याचा निर्णय महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी घेतला आहे. 

"महाकार्ड'चे लोकार्पण 
30 सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाकार्डचे लोकार्पण केले जाणार आहे. या कार्डद्वारे मेट्रोतील प्रवाशांना घरापासून गंतव्य ठिकाणापर्यंत टॅक्‍सीचे भाडे, पार्किंग शुल्क, मेट्रो तिकीट खरेदी करता येणार आहे. याशिवाय मॉल, रेस्टॉरेंटमध्येही मेट्रोकार्डचा वापर करणे शक्‍य होणार आहे. 

"ट्रायल रन'चे थेट प्रसारण 
मेट्रो रेल्वेच्या "ट्रायल रन'चे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. शहराच्या विविध विभागांतील नागरिकांना सोशल मीडियावरून थेट प्रसारणाद्वारे आनंद लुटता येणार आहे. 

Web Title: nagpur news metro