पुरुषांप्रमाणे महिलांचेही आयपीएल व्हावे 

पुरुषांप्रमाणे महिलांचेही आयपीएल व्हावे 

नागपूर - ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळणाऱ्या हरमनप्रीत व स्मृती मंधानाच्या अनुभवाचा ‘वर्ल्डकप’मध्ये संघाला खूप फायदा मिळाला. त्यामुळे भारतातही पुरुषांप्रमाणेच महिलांचेही आयपीएल सामने व्हावेत, अशी इच्छा ‘वर्ल्डकप’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व  करणाऱ्या विदर्भाच्या मोना मेश्रामने व्यक्‍त केली. ‘वर्ल्डकप’मधील कामगिरीनंतर महिला  क्रिकेटला ‘अच्छे दिन’ येतील, असे मत तिने यावेळी व्यक्‍त केले. 

स्पोर्टस जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ नागपूर (एसजेएएन)तर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात  ती बोलत होती. मोना म्हणाली, ‘वर्ल्डकप’मधील सामन्यांचे टीव्हीवर प्रथमच थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने घराघरांत महिला क्रिकेट पोहोचले आहे. विशेषत: तरुणींमध्ये क्रिकेटबद्दल अधिक आकर्षण दिसून येत आहे. अंतिम सामन्यातील पराभवाबद्दल विचारले असता मोना म्हणाली, ‘होमग्राउंड’वर खेळणाऱ्या इंग्लंड संघामध्ये अनुभवी खेळाडूंचा भरणा होता. आमच्याकडे कर्णधार मिताली राज व झुलन गोस्वामीचा अपवाद वगळता बहुतांश खेळाडू पहिल्यांदाच ‘वर्ल्डकप’ खेळत होत्या. त्यामुळे विजयाची सुवर्णसंधी असूनही केवळ अनुभव  कमी पडल्यामुळे भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. 

‘फायनल’मध्ये उडालेल्या भंबेरीनंतर महिला क्रिकेट संघाला क्रीडा मानसशास्त्राची अर्थात ‘स्पोर्टस सायकॉलॉजिस्ट’ची आवश्‍यकता आहे काय? या प्रश्‍नाच्या उत्तरात तिने नकारार्थी उत्तर दिले. मोनाने ‘वर्ल्डकप’पूर्वी बीसीसीआयने दिलेल्या सोयीसुविधांचा उल्लेख केला. विशेषत: मुंबईतील सराव शिबिराचा स्पर्धेत खूप फायदा झाल्याचे ती म्हणाली. इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वाच्या साखळी सामन्यात मिडऑनवर टिपलेला साराह टेलरचा झेल, या स्पर्धेत माझ्यासाठी वैयक्‍तिक आनंद देणारी बाब होती, असे मोनाने सांगितले. 

‘वर्ल्डकप’नंतर बीसीसीआय महिला क्रिकेटकडे आणखी लक्ष देत आहे. त्याचा फायदा देशभरातील महिला क्रिकेटपटूंना होणार आहे. ‘वर्ल्डकप’नंतर मोनाने आपला सर्व फोकस आता नव्या हंगामावर केंद्रित केला आहे. या हंगामासाठी विदर्भ क्रिकेट संघटनेने माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अंजू जैनची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्‍ती केल्यामुळे, तिच्या अनुभवाचा लाभ विदर्भातील महिला क्रिकेटपटूंना होईल, अशी अशा तिने व्यक्‍त केली. तत्पूर्वी, एसजेएएनच्या वतीने महापालिकेचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या हस्ते शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रेशीमबाग जिमखानाचे संचालक शिशिर सुदामे उपस्थित होते. 

महापालिकेतर्फे होणार नागरी सत्कार
संदीप जोशी यांनी मोनाची कामगिरी नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगून तिने अन्य खेळांतील प्रतिभावान खेळाडूंना पुढे आणण्यासाठी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच मोनाचा लवकरच महापालिकेतर्फे नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com