यादवचा अटकपूर्व जामीन कायम

यादवचा अटकपूर्व जामीन कायम

नागपूर - फटाके फोडण्याच्या कारणावरून झालेल्या यादव कुटुंबीयांवरील मारहाणप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असलेल्या मुन्ना यादव याच्या भावाची पत्नी सोनू यादव हिला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी (ता. १४) अटकपूर्व जामीन कायम केला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असलेला नागपूर भाजपचा नेता मुन्ना यादव व त्याच्या दोन्ही मुलांनी पापा यादव यांची बहीण भाऊबिजेनिमित्त घरी आली असता त्यांच्या घरावर हल्ला चढवला. पूर्ववैमनस्यातून घडलेल्या प्रकारात मुन्ना, मुलगा करण, पत्नी लक्ष्मी, बाला, अर्जुन, सोनू यांनी तक्रारकर्त्याला घरातून फरपटत बाहेर आणले. अर्जुन याने लोखंडी रॉडने मारहाण केली. 

तसेच मुन्ना आणि करण यांनी काठी तसेच लोखंडी रॉडने मारण्यास सुरुवात केली. या वेळी मंगल यादव आणि करण मुदलियार मदतीसाठी धावले असता त्यांनादेखील मारहाण करण्यात आली. घटनेच्या वेळी दोन्ही गटांतील गुंडांनी राडा करत तोडफोड केली. पापा यादव याच्या फिर्यादीवरून भाजप नेता मुन्ना यादव, दोन्ही मुले करण व अर्जुन, पत्नी नगरसेविका लक्ष्मी यादव, बाला आदींवर हत्येचा प्रयत्न करणे, जमावाला भडकावून मारहाण करण्याचा गुन्हा धंतोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सोनू यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. 

मात्र, पोलिसांद्वारे पाठविण्यात येणाऱ्या अहवालात सोनूचे नाव घेण्यात येत आहे. यामुळे अटक टाळण्यासाठी सोनू यादव हिने नागपूर सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, तो फेटाळण्यात आला. यामुळे तिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने सोनू यादव हिला दिलेला तात्पुरता अटकपूर्व जामीन पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करण्याचे निर्देश देत २५ हजार रुपयांच्या पीआर बाँडवर कायम करण्यात आला. सोनू यादवतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर, ॲड. उदय डबले आणि ॲड. निखिल गायकवाड यांनी बाजू मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com