दोन हजारांसाठी भाजीविक्रेत्याचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

नागपूर-  हातउसने घेतलेले दोन हजार रुपये परत देत नसल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी भाजीविक्रेता समीर ऊर्फ सोनू सलाम शहा (वय २१, रा. वनदेवीनगर) याचा चाकूने भोसकून खून केला. हे हत्याकांड मंगळवारी बाजारात झाल्याने गुंडांचे वर्चस्व वाढल्याचे स्पष्ट होत आहे. जरीपटका पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तीन आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली, तर अल्पवयीन मुलगा पसार झाला.

नागपूर-  हातउसने घेतलेले दोन हजार रुपये परत देत नसल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी भाजीविक्रेता समीर ऊर्फ सोनू सलाम शहा (वय २१, रा. वनदेवीनगर) याचा चाकूने भोसकून खून केला. हे हत्याकांड मंगळवारी बाजारात झाल्याने गुंडांचे वर्चस्व वाढल्याचे स्पष्ट होत आहे. जरीपटका पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तीन आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली, तर अल्पवयीन मुलगा पसार झाला.

समीर शहा आणि त्याचा भाऊ असलम शहा हे दोघे भावंड भाजीविक्रेते आहे. शहरातील काही बाजारांमध्ये जाऊन व्यवसाय करतात. आरोपी वृषभ राजू खापेकर (वय १९, बिनाकी मंगळवारी) हा त्याचा मित्र आहे. २०१६ मध्ये रमजान सणाच्या खरेदीसाठी समीरने वृषभकडून २ हजार रुपये हातउसणे घेतले होते. ते पैसे गेल्या काही दिवसांपासून वृषभ त्याला मागत होता. मात्र, समीर त्याला पैसे देण्यासाठी टाळाटाळ करीत होता. अनेकदा वृषभ पैसे मागण्यासाठी समीरच्या भाजी दुकानावर जात होता. मात्र, धंदा न झाल्याचे सांगून तो पैसे देणे टाळत होता. वृषभने शेख फैयाज ऊर्फ बाबू साब (वय २१, यशोधरानगर) या गुंडाची भेट घेतली. त्याला समीर रंगदारी करीत असल्याचे सांगून धाकदपट करण्याचे सांगितले. रविवारी सायंकाळी शेख फैयाज आणि वृषभने समीरची भेट घेऊन पैसे परत करण्याबाबत धाकदपट केले. पैसे न दिल्यास पाहून घेण्याची धमकी दिली. मंगळवार असल्यामुळे मंगळवारी चौकात भरलेल्या बाजारात समीरने भाजीपाल्याचे दुकान लावले होते. वृषभ हा फैयाज आणि आणखी एका मित्राला घेऊन रात्री साडेदहाला भाजीच्या दुकानावर पोहोचला. समीरला तिघेही आपला ‘गेम’ करतील, अशी भीती होती. त्यामुळे त्याने भाजी कापण्याचा चाकू काढून हल्ला करण्याच्या तयारीत होता. तिघेही दुकानावर येताच समीरने चाकू काढून हल्ला केला. त्यामुळे आरोपींनीही पाठीमागे लपविलेले चाकू काढून समीरवर सपासप वार करून भरबाजारातच समीरचा खात्मा केला आणि पळून गेले. बाजारातील नागरिकांनी जरीपटका पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिस काही वेळाने घटनास्थळावर पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन मेयोत रवाना करून समीरचा भाऊ असलम शहाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. आरोपींनी लगेच दोन आरोपींना अटक केली.

मैत्रीत काढला काटा
वृषभ आणि समीर या दोघांची गेल्या सहा वर्षांपासूनची मैत्री आहे. दोघेही एकमेकांशिवाय राहत नव्हते. मात्र, समीरने शाळा सोडून भाजीपाल्याचाच धंदा करण्यास सुरुवात केली, तर वृषभ हा शिक्षण घेत होता. दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे-जाणे नेहमीचेच होते. मात्र, केवळ दोन हजार रुपयांच्या उसणवारीमुळे दोघांत वितुष्ट निर्माण झाले आणि थरारक हत्याकांड घडले.