विवाह सिद्ध करण्याच्या नादात युवतीचा खून?

विवाह सिद्ध करण्याच्या नादात युवतीचा खून?

अमरावती - शहरातील एका युवतीसोबत विवाह केल्याचा तसेच न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केल्याचा दावा करणाऱ्या एका युवकाने त्याच युवतीचा भरदिवसा रस्त्यात खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (ता. २३) घडली. या घटनेने अमरावतीकर सुन्न झाले असून, खुनाच्या नेमक्‍या कारणांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. 

साईनगर परिसरात गुरुवारी प्रतीक्षा मुरलीधर मेहत्रे (वय २४, रा. छाबडा प्लॉट) या युवतीचा भररस्त्यात चाकूने सपासप वार करून खून करण्यात आला. युवतीच्या नातेवाइकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राहुल बबन भड (वय २५, रा. मुदलियारनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. राहुलने प्रतीक्षासोबत आपला विवाह झाल्याचा दावा केला होता. परंतु, ती आपल्या घरी येत नसल्याने तिला आपण नांदवायला तयार आहोत, अशी याचिकासुद्धा त्याने न्यायालयात दाखल केल्याचा त्याचा दावा होता. मात्र, त्याला अधिकृतरीत्या कुठेही दुजोरा मिळालेला नाही. दुसरीकडे खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे राहुल आपल्या मुलीशी विवाह झाल्याचे सांगत असल्याचे प्रतीक्षाच्या वडिलांचे म्हणणे आहे. प्रतीक्षाने ऑक्‍टोबर महिन्यात फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात राहुलविरुद्ध तक्रार करून त्याने सोशल मीडियावर आपले फोटो अपलोड करून बदनामी केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात राहुलविरुद्ध आय. टी. ॲक्‍टनुसार गुन्हासुद्धा दाखल झाला होता. 

राहुल कंत्राटदार होता, अशी माहिती असली तरी तो नेमका मूळचा कुठला, याची माहिती पोलिस काढत आहेत. या घटनेमागील नेमक्‍या कारणांचा शोध पोलिस घेत असून विवाह सिद्ध करण्यासाठी त्याचा आटापिटा सुरू होता काय, हे शोधण्याचे आव्हानदेखील पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. या घटनेनंतर काही राजकीय पक्षाच्या मंडळींनी राजापेठ पोलिस ठाण्यावर धाव घेऊन प्रतीक्षाच्या मारेकऱ्याला अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणात उशिरा रात्रीपर्यंत बयाण नोंदविण्याची कारवाई सुरू होती.

आक्षेपामुळे शवविच्छेदनास विलंब
प्रतीक्षा मेहत्रे हिचा मारेकरी राहुल भड याच्याविरुद्ध फ्रेजरपुरा ठाण्यात अनेक तक्रारी करूनसुद्धा पोलिसांनी त्याला अटक केली नाही. त्यामुळे खून झाल्यानंतर तरी राहुलला तत्काळ अटक करावी, अशी मागणी नातेवाइकांनी केली. त्यामुळे दुपारी घटना घडल्यानंतर सायंकाळपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com