२०० कोटींच्या कर्जावर २१२ कोटींचे व्याज 

२०० कोटींच्या कर्जावर २१२ कोटींचे व्याज 

नागपूर - जेएनएनयुआरएम प्रकल्पांसाठी महापालिकेने घेतलेल्या दोनशे कोटींच्या कर्जावर २१२ कोटींचे व्याज दिल्याप्रकरणी बॅंकेशी करार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे संकेत महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी दिले. याप्रकरणात बॅंकांकडून झालेला पत्रव्यवहार, करार आदीचा अभ्यास करणार असल्याचे आयुक्त अश्‍विन मुदगल यांनी सभागृहात सांगितले.

काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य संदीप सहारे यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासात प्रशासनावर हल्लाबोल केला. बॅंक ऑफ महाराष्ट्रने ९.५ टक्के व्याज दर आकारले. परंतु, महापालिकेनेच बॅंकेला यापेक्षा कमी व्याजदराने कर्ज देण्यासाठी इतर वित्तीय संस्था तयार असल्याचे पत्रात म्हटले आहे. कमी व्याजदराने इतर वित्तीय संस्था कर्ज देण्यास तयार असताना बॅंक ऑफ महाराष्ट्रकडूनच का घेण्यात आले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

यात महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, कराराचे उल्लंघन झाल्याचा आरोपही त्यांनी केला. याप्रकरणात आयुक्तांनी निवेदन करावे, अशी मागणी सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी केली. आयुक्तांनी याप्रकरणातील कागदपत्रांचे अवलोकन करणार असल्याचे सांगितले. महापौरांनी याप्रकरणी दोषी आढळल्यास अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आश्‍वासन सभागृहाला दिले.

शाळांत विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर
पालिका शाळांमध्ये महिला सुरक्षा रक्षक नसल्याकडे लक्ष वेधत कमलेश चौधरी यांनी विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचा आरोप केला. यावर सहायक आयुक्त धामेचा यांनी महापालिकेकडे ९९ शाळा इमारती असून, यात ९५ सुरक्षा रक्षक असल्याचे सांगितले. यावर महापौर नंदा जिचकार यांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. 

क्षमता नसतानाही हॉटमिक्‍सकडे रस्त्यांच्या फाईल 
पालिकेच्या हॉटमिक्‍स प्लांटकडे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचीही क्षमता नाही. परंतु, या विभागाकडे प्रभागातील रस्ते पूर्ण करण्याच्या फाईल देण्यात आल्या आहे, याकडे डॉ. रवींद्र भोयर, सतीश होले यांनी लक्ष वेधले. महापौर नंदा जिचकार यांनी हॉटमिक्‍स प्लांटबाबत लक्ष घालण्याचे निर्देश दिले. बॅचमिक्‍स सुरू करण्याबाबत विचार करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. 

आश्‍वासन पूर्तता समिती गठित करणार 
महापौर नंदा जिचकार यांनी दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी होत नसल्याचे प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी उदाहरणासह सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यासाठी समिती गठित करण्याची मागणी त्यांनी केली. महापौर नंदा जिचकार यांनी विधानसभेतील आश्‍वासन समितीच्या धर्तीवर मनपातही आश्‍वासन पूर्तता समिती गठित करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com