महापालिकेचे एक शौचालय 27 लाखांचे! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

नागपूर - मध्यमवर्गीयांचे चार खोल्यांचे संपूर्ण घर पंचवीस लाखांमध्ये बांधून पूर्ण होते. मात्र, श्रीमंत नागपूर महापालिकेने गांधीसागर उद्यानात एका शौचालयाच्या बांधकामावर तब्बल 27 लाख 37 हजार रुपये खर्च केले. विशेष म्हणजे इतके महागडे शौचालय शहरातील एकाही पंचतारांकित हॉटेलमध्ये उपलब्ध नाही. 

नागपूर - मध्यमवर्गीयांचे चार खोल्यांचे संपूर्ण घर पंचवीस लाखांमध्ये बांधून पूर्ण होते. मात्र, श्रीमंत नागपूर महापालिकेने गांधीसागर उद्यानात एका शौचालयाच्या बांधकामावर तब्बल 27 लाख 37 हजार रुपये खर्च केले. विशेष म्हणजे इतके महागडे शौचालय शहरातील एकाही पंचतारांकित हॉटेलमध्ये उपलब्ध नाही. 

महापालिकेने गांधीसागरचे सौंदर्यीकरण आणि खाऊगल्लीवर आतापर्यंत दोन कोटी रुपये खर्च केलेत. नेमके पैसे कुठल्या कामावर खर्च करण्यात आले, याचा तपशील गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष राजेश कुंभलकर यांनी माहितीच्या अधिकारात मागितला. यातील खर्चाची आकडेवारी बघितल्यास एवढ्या पैशात एखादे नवीन उद्यान विकसित होऊ शकले असते. खाऊगल्लीचे 30 स्टॉल 42 लाख 50 हजार 536, कोटा फिटिंग दोन लाख 95 हजार 417, खाऊगल्ली रंगरंगोटी दोन लाख 97 हजार 785, शौचालय रिपेरिंग व रंगरंगोटी दोन लाख 99 हजार 906, उद्यान शौचालय 27 लाख 37 हजार 935, चाफा झाडाचे प्लॅंटेशन एक लाख 44 हजार, फाउंटन 17 लाख 30 हजार 550, मूर्ती विसर्जन टॅंकर 95 लाख, पागे उद्यानावरील खर्च 15 लाख आणि उद्यान स्वच्छतेच्या कंत्राटावर दोन लाख 49हजार 177 खर्च करण्यात आले आहे. विशेष म्हणजे 27 लाखांच्या सुलभ शौचालयाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. उद्यानाच्या देखभालीचे कंत्राट देण्यात आले असले तरी उद्यानात कुठलीच साफसफाई होत नाही, झाडांचीही देखभाल केली जात नाही. उद्यानावर खर्च झालेली रक्कम आणि प्रत्यक्ष स्थिती बघता मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या निधीची उधळपट्टी झाल्याचे दिसून येते. या सर्व खर्चाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेच्यावतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. आयुक्तांना भेटणाऱ्या शिष्टमंडळात राजेश कुंभलकर यांच्यासह नगरसेवक मनोज साबळे, कृष्णकुमार पडवंशी, ऍड. सुरेश राजूरकर, अशोक होरे, जयराम देशमुख, लक्ष्मणराव ईटनकर, महेश तिवारी, मनीष मोरे, रवी गाडगे, राजू लांडगे, खुशाल महाजन, राजू दैवतकर, ऍड. संजय नारकर, तनुज चौबे, राजेश पुरी, पांडुरंग डोळस, गणेश उगले आदींचा समावेश होता.