पदवीधर नोंदणीसाठी शेवटचे दोन दिवस 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेटमधील दहा जागांवरील पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी पुन्हा शेवटचे दोन दिवस उरले आहेत. आतापर्यंत पंधरा हजारांवर पदवीधरांनी नव्याने नोंदणी केली असून सोमवारी किमान दहा हजारांवर मतदारांची नोंदणी होण्याची शक्‍यता आहे. 

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेटमधील दहा जागांवरील पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी पुन्हा शेवटचे दोन दिवस उरले आहेत. आतापर्यंत पंधरा हजारांवर पदवीधरांनी नव्याने नोंदणी केली असून सोमवारी किमान दहा हजारांवर मतदारांची नोंदणी होण्याची शक्‍यता आहे. 

विद्यापीठाद्वारे पदवीधर नोंदणीची 12 जुलैपासून सुरुवात करण्यात आली. शुक्रवारपर्यंत (ता. 11) पदवीधर झालेल्या मतदारांना त्याची ऑनलाइन नोंदणी करून नोंदणी केलेले अर्ज 16 ऑगस्टपर्यंत निर्धारित शुल्कासह विद्यापीठात जमा करावे लागणार होते. मात्र, ऑनलाइन अर्ज भरताना, पदवीधरांना बऱ्याच तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नोंदणीला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेत, निवेदन सादर केले होते. दरम्यान, संघटनांना पदवीधर नोंदणीसाठी 28 ऑगस्टपर्यंत नोंदणीस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता नोंदणीसाठी केवळ दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे विविध विद्यार्थी संघटना आणि शिक्षक संघटनांकडून पदवीधरांची नोंदणी करण्यासाठी परिश्रम घेण्यात येत आहे. सोमवारी (ता. 28) शेवटल्या दिवशी ही गर्दी वाढण्याची शक्‍यता आहे. अर्ज भरल्यावर 31 ऑगस्टपर्यंत पदवीधरांना "हार्डकॉपी' देता येणार आहे. संकेतस्थळावर जुन्या नोंदणीकृत पदवीधरांची माहिती असलेली सॉफ्टकॉपीही देण्यात येणार आहे. याशिवाय अर्जासंदर्भात असलेल्या सर्वच तांत्रिक अडचणी सोडविण्यात आल्या असून अर्जदाराला अर्ज "पीडीएफ' पद्धतीने "सेव्ह' करून ठेवण्याची मुभाही देण्यात आली आहे. 

वैद्यकीय आणि आयुर्वेद शाखेतील 
2002 पासून वैद्यक आणि आयुर्वेद शाखा वेगळी झाली. मात्र, या शाखेतील बऱ्याच जुन्या पदवीधरांची पदवी नागपूर विद्यापीठातील आहे. मात्र, या शाखेतील पदवीधर मतदारांना या प्रक्रियेतून बाद करण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदानाच्या हक्कापासून वंचित होण्याची भीती निर्माण झाली. विशेष म्हणजे विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाच्या पदवीधर असलेल्यांना त्यात मतदान आणि उमेदवार होण्याचा हक्क देण्यात आला आहे. असे असताना केवळ शाखा नसल्याने तो हक्क बजाविण्यापासून वंचित होत असल्याने नोंदणीला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. ती मागणी मान्य करून बी फॉर्ममध्ये या पदवीधरांना नोंदणी करता येणार आहे. 

पेमेंट ऑनलाइन पद्धतीने 
पदवीधर मतदारांना नोंदणी करताना 25 रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. यासाठी विद्यापीठाने ऑनलाइन पेमेंटची सोय करून दिली आहे. त्यामुळे अर्जदारांना क्रेडिट, डेबिट किंवा इतर मोडवरून ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करता येणार आहे. 

एक लाखावर मतदार 
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता पुन्हा एकदा विद्यापीठांमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या दोन वर्षांत विद्यापीठाच्या राजकारणात आलेली मरगळ दूर होणार असून विविध शिक्षक आणि विद्यार्थी संघटना आता सक्रिय झालेल्या आहेत. 28 ऑगस्टपर्यंत पदवीधर मतदार नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली असून 2010 पर्यंत 85 हजार 775 नोंदणी झालेली. यावर्षी 25 हजारांवर नव्या पदवीधरांची नोंदणी होण्याची शक्‍यता असल्याने एकूण नोंदणी एक लाखांच्या घरात मतदार नोंदणी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

Web Title: nagpur news nagpur university education