विद्यापीठ प्राधिकरणांसाठी उद्या मतदान

विद्यापीठ प्राधिकरणांसाठी उद्या मतदान

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट, विद्वत परिषद आणि अभ्यास मंडळातील विविध मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये शनिवारी (ता. २५) मतदान करण्यात येणार आहे. तिन्ही प्राधिकरणांसाठी एकूण २७२ उमेदवार आपले भाग्य आजमविणार आहेत. विद्यापीठाकडून निवडणुकांची तयारी पूर्ण झाली असून पाच जिल्ह्यांमध्ये ८६ मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. सकाळी आठ ते सायंकाळी चार  वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येईल.  

सिनेटच्या २९, विद्वत परिषदेच्या आठ जागा तर ५२ अभ्यास मंडळातील प्रत्येकी तीन जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी विविध गटांतील अनेक उमेदवारांचा कस लागला आहे. प्रचारासाठी सामाजिक माध्यमांचा अधिक वापर केला जात आहे. निवडणुकीसाठी विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. 

निवडणुकीतून येणाऱ्या सदस्यांमध्ये दहा प्राचार्य, दहा शिक्षक, तीन विद्यापीठ शिक्षक आणि  सहा महाविद्यालय व्यवस्थापनातील सदस्यांचा समावेश आहे. यापैकी तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.  मात्र उर्वरित जागांसाठी विद्यापीठाने सोमवारी (ता. २०) केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. ८६ या केंद्रांवर काम बघण्यासाठी २३९ निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या केंद्रांवर त्या-त्या जिल्ह्यातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 

यात नागपूर शहर आणि ग्रामीण मिळून ५१ मतदार केंद्र आहेत. तर जळगाव येथे एकच मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. मतदान केंद्रावर प्रत्येक उमेदवाराला ओळखपत्र बाळगणे अनिवार्य राहणार असून त्याशिवाय प्रवेश मिळणार नाही असे कळविण्यात आले आहे.

पसंतिक्रम नोंदवून करावे मतदान
सिनेट, विद्वत व अभ्यास मंडळांच्या प्रतिनिधी पदाच्या निवडणुकीसाठी पसंतिक्रम नोंदवून मतदान करायचे आहे. हा पसंतिक्रमांक नोंदविताना तो इंग्रजी किंवा मराठी आकड्यामध्येच (अक्षरी नव्हे) नोंदविणे, पसंतिक्रमांक देण्यास १ आकड्यापासून सुरुवात करणे, केंद्रात दिलेल्या ब्लू पेनचाच वापर करणे, उमेदवाराच्या समोर ठळक दिसेल असा पसंतिक्रमांक नोंदविणे आवश्‍यक आहे. यामध्ये काही चूक झाल्यास मत बाद ठरविले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com