उद्योजक होण्यासाठी हिंमत नि मेहनत हवी - जयसिंग चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

नागपूर : पैशाअभावी उद्योग सुरू करू शकलो नाही, असा बहाणा अनेक युवक करताना दिसतात. मात्र, उद्योजक होण्यासाठी पैसा नव्हे तर हिंमत आणि मेहनत आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक आणि रचना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक जयसिंग चव्हाण यांनी केले.  

नागपूर : पैशाअभावी उद्योग सुरू करू शकलो नाही, असा बहाणा अनेक युवक करताना दिसतात. मात्र, उद्योजक होण्यासाठी पैसा नव्हे तर हिंमत आणि मेहनत आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक आणि रचना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक जयसिंग चव्हाण यांनी केले.  

सकाळ यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कद्वारे गुरुनानक सभागृहात आयोजित ‘यिन समर युथ समिट २०१७’मध्ये ‘सक्‍सेस अुल बिझनेसमॅन’ या दुसऱ्या सत्रात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. चव्हाण म्हणाले, अगदी लहान वयात ८७ टक्के अपंगत्व आले. सतत १८ वर्षे दररोज आकाशाकडे बघून उंच उडण्याचे स्वप्न बघितले. आई-वडिलांनी दिलेल्या खाऊच्या पैशातून स्वत:च्या ट्रायसिकलवर फिरून वॉशिंग पावडर विकण्याचे काम केले. तेव्हा व्यवसाय सुरू करायचा म्हटले तर बॅंकांनीही बाहेर काढले. सामाजिक न्याय विभागानेही तीस बॅंकांच्या सह्या आणायला भर उन्हाळ्यात फिरायला लावले. मिळालेल्या पैशात व्यवसाय सुरू केला. एमआयडीसीमध्ये कंपनी सुरू केली. मात्र, नियतीने घात केला आणि आगीत कंपनी जळाली. त्यावेळी कंपनीचा विमाही लॅप्स झालेला होता. मात्र, खचलो नाही. पुन्हा नव्याने उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच आज कोट्यवधींची कंपनी उभी केली. आज बॅंका कर्ज घ्या म्हणून मागे लागतात. तेव्हा आयुष्यात जिद्द, चिकाटी बाळगून मेहनत केल्यास पैसा आपोआप येत असल्याचे त्यांनी सांगितले. जीवनाकडे सकारात्मकपणे बघण्याचा सल्ला त्यांनी दिला. आपण केलेल्या कामाचे मार्केटिंग करा, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्‍नोत्तराच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधून मनातील शंकांचे निरसन केले. 

होतकरूंना दत्तक घ्या 
समाजात अनेक अशी मुले आहेत, ज्यांच्यामध्ये बरेच काही करण्याची क्षमता आहे. मात्र, परिस्थितीअभावी त्यांना काम मिळत नाही. अशा दिव्यांग आणि मतिमंद आणि समाजातील होतकरू मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांना दत्तक घेण्याचे आवाहन उद्योजक जयसिंग चव्हाण यांनी केले.