पंतप्रधानांना इतरांचे ऐकण्याची सवय नाही: भाजप खासदार पटोले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

भ्रष्टाचाऱ्यांकडून पैसा वसूल करा 
"गोसेखुर्द प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाला. भ्रष्टाचार करणारे ठेकेदारच आता आमदार, खासदार झाले आहेत. भ्रष्टाचारामुळे हा प्रकल्प अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्याकडून वसुली करावी, अशी मागणीही पटोले यांनी केली. रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे,'' असा सल्लाही पटोलेंनी दिला.

नागपूर - "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकण्याची सवय नाही. इतरांनी सांगितलेले त्यांना पटतसुद्धा नाही. ते लवकर चिडतात,'' असा आरोप भंडारा-गोंदियाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

"मी स्पष्ट बोलतो. ते अनेकांना आवडत नाहीत. मात्र मी कुणाला भीत नाही,'' असे सांगताना त्यांनी जीएसटीमुळे गृहउद्योग आणि हातमाग उद्योग डबघाईस आल्याचे सांगून सरकारच्या धोरणावरही टीका केली. 

ऍग्रोव्हेट आणि ऍग्रोइंजिनिअर मित्र परिवारच्या वतीने आयोजित "विदर्भातील सिंचन सुविधा आणि शेतकऱ्यांचे अश्रू' या विषयावर आयोजित चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

पटोले म्हणाले, "पंतप्रधान मोदी नियमितपणे काही राज्यांच्या खासदारांची बैठक घेतात. यात त्यांना येणाऱ्या अडचणी, योजना आणि कारभाराबाबत मत विचारतात. काही मोजकेच लोकप्रतिनिधी मत व्यक्त करतात. प्रश्‍न विचारला तर तुम्हाला योजना माहीत नाही का? ती आधी माहीत करून घ्या, असे सांगून खाली बसण्यास सांगतात. पंतप्रधानांना इतरांचे ऐकण्याची सवय नाही.'' 

भ्रष्टाचाऱ्यांकडून पैसा वसूल करा 
"गोसेखुर्द प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाला. भ्रष्टाचार करणारे ठेकेदारच आता आमदार, खासदार झाले आहेत. भ्रष्टाचारामुळे हा प्रकल्प अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्याकडून वसुली करावी, अशी मागणीही पटोले यांनी केली. रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे,'' असा सल्लाही पटोलेंनी दिला. 

निधी आणण्यास राज्य अपयशी 
"खासदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी राज्याला मिळतो. अनेक राज्ये यात अग्रसेर आहेत. महाराष्ट्र मात्र मागे आहे. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खासदरांची बैठक बोलाविण्यात येते. एका बैठकीत मी महाराष्ट्राचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेणेच बंद केले,'' असे सांगून खासदार पटोले फडणवीस यांच्यावरही अप्रत्यक्षपणे तोफ डागली. खासदारांची मदत घेतल्यास आपले वर्चस्व कमी होईल, अशी भीती आमदारांना वाटत असावी, असेही त्यांनी नमूद केले.