शहांच्या भेटीसाठी राणेंचा नागपूर दौरा रद्द

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

नागपूर - काँग्रेसमुक्त होताच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राज्यभरात दौरे करण्यासाठी नागपुरातून सुरुवात करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, भाजपमध्ये प्रवेशासाठी उत्सुक असलेले राणे यांना भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत बोलावल्याने  तूर्तास त्यांचा नागपूर दौरा रद्द झाला आहे. 

नागपूर - काँग्रेसमुक्त होताच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राज्यभरात दौरे करण्यासाठी नागपुरातून सुरुवात करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, भाजपमध्ये प्रवेशासाठी उत्सुक असलेले राणे यांना भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत बोलावल्याने  तूर्तास त्यांचा नागपूर दौरा रद्द झाला आहे. 

राणेंची भाजपाध्यक्ष शहा यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री शिष्टाई करणार असल्याचे समजते. बारा वर्षांपूर्वी नारायण राणे यांनी शिवसेनेवर आरोपांचे बाण सोडत जय महाराष्ट्र केले होते. काँग्रेसमध्ये प्रवेश निश्‍चित झाल्यानंतरच त्यांनी हे पाऊल उचलले होते. काँग्रेसने त्यांना मंत्री केले, मुलांनाही लोकसभा तसेच विधानसभेची  उमेदवारी दिली.

 आता काँग्रेसने फसवणूक केल्याचा आरोप करीत राणेंनी काँग्रेसचा हात सोडला. घटस्थापनेच्या मुहूर्तावर राजीनामा देताना त्यांनी राज्यभर दौरा करू व नागपुरातून त्याची सुरुवात करू अशी घोषणा केली होती. राणे नागपुरात येणार असल्यामुळे ते येथे कुणासोबत भेटतात? काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नागपुरातील त्यांच्या समर्थकांनी तयारीही सुरू केली होती. राणे शनिवारी नागपुरात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, ते शनिवारी आले नाही आता रविवारी येतील अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. मात्र, ही शक्‍यता कमीच असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. राणे हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भाजपातील एक गट त्यांना घेण्यास अनुकूल नसल्याची तसेच राणे हे स्वत:चा वेगळा पक्ष काढणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, सोमवारी (२५ सप्टेंबर) रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राणे यांना दिल्लीला बोलावले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील सोमवारी दिल्लीला जाणार आहेत. राणे यांच्या भाजपप्रवेशाबाबत मुख्यमंत्री शिष्टाई करणार असल्याचे समजते. दिल्लीत निर्णय झाल्यानंतरच राणे यांचा राज्यव्यापी दौरा सुरू होईल, अशी माहिती नागपुरातील त्यांच्या समर्थकांनी दिली.