वैष्णवीने रचला स्मरणशक्तीचा राष्ट्रीय विक्रम 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

कल्पनाशक्ती व स्मरणशक्तीच्या जोरावर मी एवढे शब्द क्रमाने लक्षात ठेवू शकले. यासाठी विशेष तयारी केली नाही. पण बरेचदा घरी सराव करत असते. आता एशिया बूकसाठी प्रयत्न करण्यापूर्वी बारावीच्या अभ्यासावर फोकस करायचा आहे. 
- वैष्णवी मनोहर पोटे

नागपूर - दहा मिनिटांत शंभर शब्दांचे पाठांतर करून स्मरणशक्तीच्या जोरावर त्यातील 98 टक्के शब्द सरळ व उलट्या क्रमाने लक्षात ठेवण्याचा राष्ट्रीय विक्रम वैष्णवी मानोहर पोटे या नागपूरकर तरुणीने आज (सोमवार) नोंदवला. या अनोख्या विक्रमासाठी तिला इंडिया बूक ऑफ रेकॉर्डस्‌चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले असून पुढील वर्षीच्या आवृत्तीत त्याची नोंदही घेण्यात येईल. 

एकपाठी असलेल्या अनेकांनी आपापल्या पद्धतिने विविध विक्रम नोंदविले आहेत. मात्र, वैष्णवीने विशिष्ट्य कॅटॅगरीसाठी "इंडिया बूक ऑफ रेकॉर्डस्‌'कडे अर्ज केला. त्यानुसार चिटणवीस सेंटर येथे तिने या विक्रमासाठी प्रयत्न केला. परीक्षक मनोज तत्ववादी यांनी ऐनवेळी तिला शंभर शब्दांची यादी दिली. एक ते शंभर या क्रमाने असलेले सर्व शब्द पाठ करण्यासाठी वैष्णवीला दहा मिनिटे देण्यात आली. त्यानंतर तिने सरळ व उलट्या क्रमाने काही अपवाद वगळता सर्व शब्द अचूक सांगितले. उपस्थितांनी कोणत्या क्रमांकावर कुठला शब्द आहे आणि कोणता शब्द कुठल्या क्रमांकावर आहे, असेही प्रश्‍न विचारले. त्यातील बहुतांशी प्रश्‍नांची उत्तरे तिने अचूक दिली. त्यानंतर परीक्षकांनी संपूर्ण तपासणी करीत वैष्णवीने केवळ दोन टक्के चुका केल्याचे सांगितले. इंडिया बूक ऑफ रेकॉर्डस्‌च्या निकषांनुसार दोन टक्‍क्‍यांपर्यंतच्या चुका ग्राह्य धरल्या जात नाहीत, असे सांगून त्यांनी वैष्णवीने राष्ट्रीय विक्रम रचल्याची घोषणा केली. इतर कुणीही या कॅटॅगरीत प्रयत्न केला नसल्याने वैष्णवीने नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला आहे, असेही ते म्हणाले. ती भवन्समध्ये बारावीची विद्यार्थिनी असून दहाव्या वर्गात 92 टक्के गुण तिने पटकावले होते. वैष्णवीचे वडील मनोहर पोटे तहसीलदार असून ते पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वीय सचिवसुद्धा आहेत. यावेळी वडील मनोहर पोटे, आई सूवर्णा पोटे, शिक्षिका वैशाली कोढे यांची उपस्थिती होती. 

टॅग्स