सात नक्षलवादी ठार

सात नक्षलवादी ठार

गडचिरोली - सिरोंचा तालुक्‍यातील कल्लेड येथील जंगलात आज सकाळी झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी सात नक्षलवाद्यांचा खातमा केला. मृतांत ५ महिला, तर २ पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या चकमकीत एकूण ११ नक्षलवादी ठार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. घटनास्थळी पोलिसांना मोठा शस्त्रसाठा हाती लागला.

छत्तीसगड, महाराष्ट्र व तेलंगण सीमेलगत असलेल्या कल्लेड जंगलात नक्षलवाद्यांचे शिबिर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर सी-६० पथकाचे कमांडर मोतीराम मडावी यांच्या नेतृत्वात पथक त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केल्यानंतर नक्षलवादी पसार झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे ५ महिला व २ पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह तसेच चार भरमार बंदूक, तीन किलो आरडीएक्‍स, ताडपत्री, भूसुरुंग स्फोट घडवून आणण्यासाठी वापरण्यात येणारा कुकर, स्टील डब्बे व अन्य साहित्य आढळून आले. हेलिकॉप्टरने नक्षलवाद्यांचे मृतदेह अहेरी येथील प्राणहिता पोलिस मुख्यालयात आणण्यात आले. त्यानंतर शरणागती पत्करलेल्या नक्षलवाद्यांकडून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी सापडलेल्या साहित्यावरून मृतांमध्ये वरिष्ठ कॅडरचे नक्षलवादी असावेत, असा अंदाज वर्तविला जात आहे. २ डिसेंबरपासून नक्षलवाद्यांनी स्थापन केलेल्या पीपल्स लिबरेशन गुर्रिला आर्मीचा १७ वा स्थापना सप्ताह सुरू झाला. या सप्ताहापूर्वीच नक्षलवाद्यांनी जिल्ह्यात उच्छाद मांडून पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून ५ नागरिकांची हत्या केली होती. शिवाय कोटगूल येथील भूसुरुंगस्फोटात हवालदार सुरेश गावडे, तर टवेटोला येथील जंगलात झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे जवान मंजुनाथ शिवलिंगप्पा हुतात्मा झाले होते. नक्षलवाद्यांच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्यासाठी पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिस महासंचालक डी. कनकरत्नम व पोलिस महानिरीक्षक शरद शेलार जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. तसेच नक्षलवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून पोलिसांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत सात नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले. 

गेल्या ३५ वर्षांतील मोठी कारवाई
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्‍यात ३५ वर्षांत पोलिसांनी आज मोठी कारवाई केली. कारवाईनंतर पोलिसांनी दिवसभर कल्लेड जंगल परिसर पिंजून काढला. एकेकाळी याच भागात नक्षलवाद्यांची मोठी दहशत होती. मात्र, आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्याविरोधात सतत अभियान राबविल्यानंतर या भागातून नक्षलवादी हद्दपार झाले होते; परंतु पुन्हा दहशत पसरविण्याच्या हेतूने आलेल्या नक्षलवाद्यांना या कारवाईमुळे मोठी चपराक बसली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com