ग्राहकांच्या माथी भेसळ

ग्राहकांच्या माथी भेसळ

नागपूर - सध्या पेट्रोल पंप मशीनमध्ये पल्सर नावाची मायक्रो चिप लावून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार एकापाठोपाठ एक उघड होत आहेत. याशिवाय अनेक पंपांवर इंधनात भेसळ करून अनेक वर्षांपासून ग्राहकांची लूटमार केली जात आहे. याकडे वैध मापन विभाग मात्र डोळेझाक करीत आहे.

ठाणे गुन्हे शाखेच्या हाती विवेक शेट्ये नावाचा उच्चशिक्षित युवक हाती लागला. त्याने महाराष्ट्रातील जवळपास ९० टक्‍केपेक्षा जास्त पेट्रोल पंपांवरील मशीनमध्ये पल्सर मायक्रो चिप बसवून पेट्रोल चोरीचा फंडा पंपमालकांना दिला. मात्र, पंपचालकांच्या पापाचा घडा भरल्यामुळे ठाणे पोलिसांनी राज्यभरात छापे सुरू केले. आतापर्यंत ४५ पंपावरील मशीन सिलबंद करण्यात आल्या. मात्र, पेट्रोल आणि डिझेलमध्ये होत असलेली भेसळही यानिमित्ताने पुढे येत आहे. पहाटे तीन ते चारच्या सुमारास अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेलमध्ये भेसळ करण्यासाठी टॅंकर येतो. त्यामधून फ्युअल टॅंकमध्ये टॅंकर रिचविल्या जाते. नाफ्ता नावाचे केमिकल पेट्रोल आणि डिझेलमध्ये सहज एकरूप होते. त्यामुळे कुणालाही याबाबत संशय येत नाही. काही मर्यादेपर्यंत नाफ्ता मिसळण्याची परवानगी आहे. मात्र, त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. 

येथे पडले होते छापे
भंडारा रोडवरील कापसी खुर्द येथील पॉल ऑटोमाबाईल पेट्रोल पंपावर डिझेलमध्ये रसायनाची भेसळ करताना कळमना पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी छापा टाकून पकडले होते. या प्रकरणात पंपचालकासह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या वेळी मालक गंगाधर पाल  यांच्या सहमतीने पंपावरील टाकीत दोन टॅंकरभर रसायन मिक्‍स केल्या जात आहे. त्या रसायनाची किंमत १५ लाख ७६ हजार एवढी होती. ठाणेदार सुनील बोंडे यांनी सर्वप्रथम हा घोटाळा उघडकीस आणून संगीत वाघमारे, राजेश पाटील, भालचंद्र टेंभरे (चालक) आणि राजू परीहार  यांना अटक केली होती. तेव्हापासून अनेक पेट्रोल पंप मालकांनी रसायन भेसळ बंद केली होती. मात्र, सध्या मोठ्या प्रमाणात भेसळ सुरू असल्याची माहिती आहे.

वाह रे ‘स्पीड’ पेट्रोल!
प्रत्येक पेट्रोल पंपावर किमान एक तरी मशीन स्पीड पेट्रोलची असते. जवळपास तीन ते चार रुपयांनी साध्या पेट्रोलपेक्षा महाग असते. मात्र, स्पीड पेट्रोलचा फंडा कुणाच्याही लक्षात येत नाही. ‘वाहन ॲव्हरेज जास्त देते’ एवढेच पटवून सांगून स्पीड पेट्रोल टाकण्यासाठी पटवून देतात. मात्र, हे कितपत खरे याबाबत कुणीही चौकशीही करीत नाही किंवा भानगडीतही पडत नाही. त्यामुळे साधेच पेट्रोल स्पीडच्या नावाखाली ग्राहकांच्या माथी मारतात, अशी अनेकांची तक्रार असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com