‘पिकनिक स्पॉट’ ठरले ‘मौत का कुआँ’ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

नागपूर - पिकनिकसाठी गेलेल्या तरुणांच्या जिवावर पाण्याशी खेळ बेतल्याच्या घटना यापूर्वीही वाकी, कळमेश्‍वर, कान्होलीबारा, हिंगणा येथील तलावावर घडल्या आहेत. आनंदोत्सव साजरा करण्यास गेलेल्या शेकडो जणांचा मृत्यू झाला. या घटनांतूनही तरुणाई धडा घेत नसल्याने पालकांत चिंतेचे वातावरण आहे.

नागपूर - पिकनिकसाठी गेलेल्या तरुणांच्या जिवावर पाण्याशी खेळ बेतल्याच्या घटना यापूर्वीही वाकी, कळमेश्‍वर, कान्होलीबारा, हिंगणा येथील तलावावर घडल्या आहेत. आनंदोत्सव साजरा करण्यास गेलेल्या शेकडो जणांचा मृत्यू झाला. या घटनांतूनही तरुणाई धडा घेत नसल्याने पालकांत चिंतेचे वातावरण आहे.

जिल्ह्यात अनेक ज्ञात-अज्ञात पिकनिक स्पॉट असून, यातील तलावांच्या बाजूचेच अनेक आहेत. काल, सायंकाळी वेणा येथील तलावामध्ये बोट उलटल्याने अकरा जण बुडाले. यातील सात जणांचा मृत्यू झाला. हे सर्व तरुण येथे पार्टी करण्यास गेले होते. तरुणाईचा हा उच्छाद त्यांच्या जिवावर बेतला. वेणा येथील तलावाप्रमाणेच जिल्ह्यातील सावनेर तालुक्‍यातील वाकी हा पिकनिक स्पॉट अनेकांसाठी कर्दनकाळ ठरला. नदीच्या अपघातप्रवण किनाऱ्यावर धोक्‍याचा फलक लावला आहे. तेथे मृतांची नावेही लिहिली आहे. एवढे करूनही तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थी तेथे जातात अन्‌ खेळ करतात. २००९ पासून आतापर्यंत येथे दोन डॉक्‍टरसह १३ जणांचा मृत्यू झाला. एवढेच नव्हे हिंगणा तालुक्‍यातील झिल्पी तलावात २०१० मध्ये दोन मुले बुडून मृत्यू पावली. कान्होलीबारा येथील तलावाजवळ पिकनिकसाठी गेलेले दत्ता मेघे कॉलेजचे दोन मुले बुडून मरण पावली. २०१५ मध्ये कोंढाळीजवळील गांढूळ तलावावर पिकनिकसाठी गेलेली दोन मुलांना या तलावात जलसमाधी मिळाली. या वर्षाच्या सुरुवातील मार्च-एप्रिलमध्ये कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा गावाजवळील तलावाच्या ठिकाणी सहा मुले पिकनिकसाठी गेली होती. पार्टीच्या आनंदोत्सवात या सहा जणांना पाण्याशी खेळ करणे भोवले. अग्निशमन विभागाकडे नोंद  असलेली ही आकडेवारी आहे. मात्र, अग्निशमन विभागाकडे नोंद नसलेली आकडेवारी लक्षात घेतल्यास मागील वर्षी बेसापुढील तलावाच्या ठिकाणी चार महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू झाला. याशिवाय खिंडसी येथेही अशा घटना घडल्या आहेत. तरीही तरुणाई गंभीर होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.

...तर वाचले असते राहुलचे प्राण
राहुल दिलीप जाधव (२९) हा युवक नवीन सुभेदार ले-आउटमध्ये राहतो. त्याला दोन बहिणी असून, एक विवाहित, तर दुसरी पदवीचे शिक्षण घेत आहे. वडील बॅंक ऑफ इंडियामध्ये लिपिक आहेत. राहुलला अभ्यासाची गोडी होती. त्याने एमसीएपर्यंत शिक्षण केले. त्याला चार बॅंकांतील नोकरीच्या ऑफर होत्या. मात्र, राहुल बजाज फायनान्स कार्यालयात असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरीवर होता. त्याने पदवीपर्यंत काँग्रेसनगरातील धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. मृत्यू पावलेल्यांपैकी सात जण वर्गमित्र होते. दिलीप जाधव यांच्या मित्राच्या मुलाला मुलगी झाली. तिला बघायला जायचे होते. रविवारी राहुल आणि वडील दोन वाजता निघणार होते. मात्र, राहुलला मित्राचा फोन आला आणि तो ‘बाबा सायंकाळी जाऊया’ एवढे बोलून बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेहच आला. त्यामुळे वृद्ध आई-वडिलांना धक्‍काच बसला. राहुल वडिलांसोबत बाळाला बघायला गेला असता तर त्याचा जीव वाचला असता.

एका तलावात शेती, तर दुसऱ्यात जीव
पंकज डोमाजी डोईफोडे (२८) हा वृद्ध आईसह उदयनगरात राहत होता. त्याच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. त्याला चार विवाहित बहिणी आहे. टेक्‍नॉलॉजीमध्ये अत्यंत हुशार असलेल्या पंकजला कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल आणि अन्य इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंची इत्थंभूत माहिती. त्याने धनवटे कॉलेजमधून बीसीएपर्यंत शिक्षण केले. त्याला दोन वर्षांपूर्वी ॲक्‍सिस बॅंकेत नोकरी मिळाली. दोन वर्षे नोकरी केल्यानंतर पॅकेज चांगले मिळाल्यामुळे त्याने एचडीएफसी बॅंकेची नोकरी स्वीकारली. लग्नासाठी मुलगी शोधणे सुरू होते. त्याची बुटीबोरी येथे शेती होती. मात्र, तलावाच्या बांधकामासाठी ती शेती गेली. दुसऱ्या तलावात त्याचा जीव गेला. एकुलता असलेल्या पंकजच्या जाण्यामुळे वृद्ध आईचा जीव कासावीस झाला आहे. दिवसभरापासून तिच्या तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता. त्यामुळे शेजाऱ्यांनी मुलाचा मृतदेह येईपर्यंत कसाबसा सांभाळ केला.

जगण्याचा आधार हिरावला
प्रतीक आमडे (२२) हा आई आणि लहान बहिणीसह उदयनगरात राहत होता. प्रतीक हा गार्डनिंग कंपनीत पर्यवेक्षक म्हणून नोकरीवर होता. प्रतीकने शहरातील अनेक गार्डन आणि लॉन गवत आणि फुलांनी सजवले होते. त्याचे वडील बीएसएनएल विभागात नोकरीवर होते. मात्र, आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी प्रतीक दोन वर्षांचा होता. दोन मुलांची जबाबदारी आल्यामुळे आईने हिंमत न खचू देता लढा दिला. पतीच्या मृत्यूनंतर बीएसएनएलमध्ये नोकरी मिळाली. तेव्हापासून मुलगा प्रतीक आणि मुलीला शिक्षणाचे बाळकडू पाजले. मुलगी शिक्षणासह जॉब करते, तर प्रतीकही चांगल्या कमाईला लागला होता. एकाच्या कमाईवर संथगतीने सुरू असलेला कुटुंबाचा गाडा सध्या तिघांच्या कमाईमुळे धावत होता. प्रतीक हा पंकज डोईफोडेचा मित्र होता. त्यांची ओळख चौकात असलेल्या नेटकॅफेवर झाली होती. तेव्हापासून तो पंकजसोबत राहत होता. पंकजने त्याला सकाळीच वेणा तलावावर पार्टीसाठी जाण्याचे निमंत्रण दिले. कुटुंबाचा आधारवड असलेला प्रतीक आज हरवल्याने आई व बहिणीच्या नशिबी पुन्हा एकाकी जीवन जगण्याची वेळ आली आहे.

अमोलची आपबिती
मित्राला नोकरी लागल्यामुळे आनंद साजरा करण्यासाठी गेलो होतो. नावाड्याला दोन बोटी  घ्यायला सांगितल्या. परंतु, त्याने ‘कुछ नही होता, मेरा हमेशा का काम है’ असे म्हणून एकाच बोटीत बसवले. एक राउंड पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या राउंडला तलावाच्यामध्ये गेल्यानंतर मित्रांना सेल्फी घेण्याचा मोह अडला. सर्व जण एका बाजूला गेल्यामुळे नाव बुडाली. सर्व मित्र पाण्यात गटागळ्या खाऊ लागले. आम्ही तिघे कसेबसे बचावलो, असे अमोल दोडके याने सांगितले. अमोल वाडीच्या खासगी रुग्णालयात भरती आहे.

घटनास्थळी जमाव
घटनास्थळी सकाळपासून मोठी गर्दी होती. घरादाराला कुलूप लावून मृतांच्या आप्तेष्टांसह नागरिक दाखल झाले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रकाश गजभिये, आमदार सुधाकर कोहळे यांनी घटनेचा व मदतकार्याचा आढावा घेतला. ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे, उपअधीक्षक सुरेश भोयर, कळमेश्‍वरचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे हे तळ ठोकून होते. 

स्थानिक मच्छीमारच सरस
रविवारी रात्री अंधारात थांबविलेली शोधमोहीम सोमवारी सकाळी सहा वाजता सुरू झाली. कळमेश्‍वर पोलिस कर्मचारी व पेठचे गावकरी, तसेच नागपूरच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन साहाय्यता दलाच्या मदतीने शोधकार्य सुरू झाले. मात्र, दोन तास एकही मृतदेह हाती लागला नव्हता. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती दलाला पाचारण करण्याची कार्यवाही झाली. त्यासाठी दिल्लीहून विशेष विमानाने ही चमू येणार होती. मात्र, त्यासाठी शासकीय परवानगीचे सोपस्कार करण्यास बराच वेळ जाणार होता. इकडे राज्य आपत्ती व्यवस्थापनाच दल शर्थीचे प्रयत्न करीत होते. यातच स्थानिक मच्छीमारांच्या प्रयत्नांना यश आले. आठच्या सुमारास एक मृतदेह हाती लागला. जवळपास १३ तास चाललेल्या या मोहिमेत प्रशिक्षित चमूपेक्षा स्थानिक मच्छीमार सरस ठरले. तशी कबुलीही शासकीय अधिकाऱ्यांनी दिली. बचाव दलाने ३ बोटींच्या साहाय्याने शोध घेतला. तत्पूर्वी पेठ निवासी नागरिक शंकर बावणे, मनोज बावणे, बाळू बावणे, दिनेश बावणे त्यांच्या कुटूंबातील एक सदस्य अतुल बावणे याचा समावेश असल्याने रात्रभर शोध सुरूच ठेवला होता. सर्व मृतदेह कळमेश्वर येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. या बचावपथकात राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे २५ व कळमेश्वर पोलिसांचे २५ कर्मचारी होते. 
 

संकलन : संजय खांडेकर, गजेंद्र डोंगरे, विजय वानखेडे, अजय धर्मपुरीवार