पोलिस ठाण्यांत होणार अंतर्गत बदल

अनिल कांबळे 
शुक्रवार, 2 जून 2017

नागपूर - शहरातील पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करून ‘स्मार्ट पोलिसिंग’ भर देण्यात येत आहे. बदल्यांसह पोलिस ठाण्यातील अंतर्गत बदलही लवकरच करण्यात येईल. पोलिस ठाण्यातील कामकाज सुरळीत होण्यासाठी अपेक्षित बदलावर भर देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम यांनी ‘सकाळ’ला दिली. 

‘सकाळ’ने शहरातील पोलिस ठाण्यातील कारभारावर गेल्या चार दिवसांपासून ‘ठाण्यातील कारभार सुधारणार कसा?’ ही चार भागांची वृत्तमालिका प्रकाशित केली होती. यामध्ये ठाण्यात स्थापन करण्यात आलेल्या पोलिस पथकांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला होता. यामध्ये डिटेक्‍शन ब्रॅंच (डीबी), व्हेरिफिकेशन ब्रॅंच, वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे रायटर, नाका तपासणी पथक, पॅट्रोलिंग चार्ली, पॅट्रोलिंग मोबाईल वाहन, पोलिस मित्र, ड्यूटी अंमलदार, अर्ज चौकशी विभाग, महिला व बालपथक तसेच मिसिंग पथकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍न उपस्थित केले होते. प्रत्येक पथकाची जबाबदारी आणि पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका यांची सांगड न घातल्यामुळे पोलिस ठाण्यातील कामकाजावर परिणाम पडतो. तसेच ठाण्यातील कारभार पारदर्शी होऊ शकत नाही. हीच बाब हेरून ‘सकाळ’ने वृत्तामालिका प्रकाशित केले. या वृत्तमालिकेची पोलिस आयुक्‍तांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी पोलिस ठाण्यातील दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला. तसेच वेगवेगळ्या पोलिस पथकांचे काम आणि रिझल्ट शिटही तयार करण्यास सांगितल्याची माहिती आहे.

पोलिस ठाण्यातील कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी योग्य ते प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक तक्रारदारांचे समाधान व्हावे तसेच योग्य तपास व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. पथकाने आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावासुद्धा घेण्यात येईल. शहरातील लोकाभिमुख पोलिसिंगसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तीन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

-डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्‍त.

टॅग्स