मनोरुग्णालयाला रिक्तपदांचा विळखा  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

अशी आहेत रिक्‍त पदे
पदनाम    रिक्‍त पदे
 वैद्यकीय अधीक्षक    १  
 वैद्यकीय उपअधीक्षक    १  
 मुख्य प्रशासकीय अधिकारी    १
 मानसोपचार तज्ज्ञ (वर्ग एक)    ९   
 इंचार्ज सिस्टर    ४   
 मानसोपचारतज्ज्ञ परिचारिका    ५   
 वॉर्ड बॉय    ४६

नागपूर - प्रादेशिक मनोरुग्णालयात भरती मनोरुग्णांना वेडेपणाचे झटके आले की, त्यांना नियंत्रणात आणण्यापासून उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांपर्यंत पोहोचवणे, वॉर्डात सोडणे, वॉर्डात त्यांचा सांभाळ करण्याचे काम ‘वॉर्ड बॉय’ (पुरुष व स्त्री परिचर) करतात. परंतु, नागपूरच्या मनोरुग्णालयात वॉर्ड बॉयची तब्बल ४६ पदे रिक्त आहेत. याशिवाय वर्ग १ मध्ये मोडणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञांची सर्वच्या सर्व ९ पदे रिक्त आहेत.  

मानसिक आरोग्यावर प्रभावी उपचार करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मनोरुग्णालयात विविध उपक्रम राबवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. असे उपक्रम राबवण्यासाठी ‘वॉर्ड बॉय’पासून तर मनोविकारतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्यांचे योगदान असते. रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनाकडून केवळ प्रस्ताव सादर केला जातो. मात्र, कोणताही पाठपुरावा केला जात नाही. उलट अनेकांना प्रतिनियुक्तीवर विविध विभागांत पाठविले जाते. 

मनोरुग्णांची संख्या लक्षात घेता, प्रत्येक वॉर्डात सकाळ, दुपार आणि रात्रपाळीत किमान तीन ते चार वॉर्ड बॉय असावे, असा नियम आहे. परंतु, प्रत्यक्षात एका वॉर्डात ‘एक’ वॉर्ड बॉय पन्नासपेक्षा जास्त मनोरुग्णांना सांभाळण्याचे आव्हान पेलतो. 

याशिवाय इंचार्ज सिस्टरच्या ४ आणि मानसोपचार विषयात तज्ज्ञ असलेल्या परिचारिकांची ५ पदे रिक्त आहेत. याचा अप्रत्यक्षरीत्या मनोरुग्णांच्या सेवेवर परिणाम होतो.

अधीक्षक प्रभारावर, फिजिशियन प्रतिनियुक्तीवर 
राज्यात चार मनोरुग्णालये आहेत. प्रत्येक ठिकाणी एकच वैद्यकीय अधीक्षक काम करतो. मात्र, नागपूरच्या मनोरुग्णालयात डॉ. आर. एस. फारुकी आणि डॉ. प्रवीण नवखरे असे दोन वैद्यकीय अधीक्षक कार्यरत आहेत. दोन वैद्यकीय अधीक्षक असूनही औषध घोटाळा होतो. येथील मनोरुग्णांची प्रकृती बिघडल्यास त्यांची तत्काळ तपासणी व्हावी यासाठी एमडी मेडिसीन असे एक फिजिशियनचे पद आहे. हे पद रिक्त आहे. विशेष म्हणजे येथे संबंधिताला प्रतिनियुक्ती देण्यात आली. मात्र, प्रतिनियुक्तीवर फिजिशियन असतानाही प्रकृती खालावली की, बारा किलोमीटरचे अंतर कापून मेडिकलमध्ये रुग्णाला उपचारासाठी रेफर केले जाते.