रेल्वेत घास घेताय... सावधान!

रेल्वेत घास घेताय... सावधान!

नागपूर - सर्वांत स्वस्त आणि सुरक्षित पर्याय म्हणून प्रवाशांचे रेल्वेला प्राधान्य असते. रेल्वे प्रवासात खाण्यापिण्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात डब्यात उपलब्ध होणाऱ्या अन्नपदार्थांवर अवलंबून राहावे लागते. अशावेळी प्रवाशांनी योग्य काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. जराही निष्काळजीपणा थेट आरोग्याला घातक परिणाम करणारा ठरू शकतो. प्रवासात अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासणे शक्‍य नसते. यामुळे गरजेएवढेच खा, तेही अगदी डोळसपणे. अन्नपदार्थ ताजे आणि स्वच्छ असल्याची खात्री करूनच सेवन करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. 
प्रवासादरम्यान रेल्वेच्या अधिकृत विक्रेत्यांशिवाय अनधिकृत विक्रेतेही डब्यात शिरतात. त्यांच्याकडील पदार्थांच्या गुणवत्तेबाबत निश्‍चित सांगता येत नाही. उघड्यावरील अन्नपदार्थ घातकच असतात. अडीच तासांपेक्षा अधिक काळ राहिलेल्या पदार्थांवर जिवाणू हल्ला सुरू करतात. यामुळे शिळे किंवा अगदीच गार पदार्थ टाळावेत. ताजे अन्नसुद्धा व्यवस्थित झाकलेले असल्याची खात्री करावी. अन्नपदार्थांमध्ये खाद्याच्या रंगाचा वापर केला जाऊ नये, असा स्पष्ट नियम असतानाही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भात किंवा तत्सम पदार्थ शिजवताना रंगाचा वापर होतो. प्रवासात जंकफूड टाळणे कधीही उपयुक्त; पण ते घेणे अपरिहार्यच असेल, तर त्यावर अंकित मुदत तपासून घ्यावी. योग्य पॅकिंग नसेल, तर बॅक्‍टेरिया वाढत जातात. गंजलेले टिनाचे डबे अधिक घातक ठरतात. योग्य काळजी घेतली गेली नाही तर प्रसंगी प्रवाशांना अन्नातून विषबाधाही होऊ शकते. 

स्वच्छता सर्वाधिक महत्त्वाची ठरते. यामुळे रेल्वेतील विक्रेत्यांनी व्यक्तिगत स्वच्छतेची काळजी घेणे आवश्‍यक आहे. कामाच्या व्यापात विक्रेते ही काळजी घेत नाहीत. प्रवाशांनी वेळोवेळी निरीक्षण करून विक्रेत्यांना हटकल्यास त्यांनाही चांगल्या राहणीमानाची सवय जडेल. प्रवासादरम्यान गहू, डाळ, भाज्या, अंडी हे चांगले अन्न आहे. दूध सर्वाधिक चांगले आणि सकस आहार ठरते. म्हणूनच रेल्वे स्थानकावर दूधविक्रेत्यांना कमी दरात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

प्रवासी सुरक्षितता लक्षात घेऊन आरोग्य निरीक्षकांच्या माध्यमातून सातत्याने अन्नपदार्थ आणि ते तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केली जाते. दरमहा एका स्थानकावरून किमान ५० ते ६० नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जातात. रेल्वेची भायखळा (मुंबई) येथे केंद्रीय गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा आणि नागपुरात राज्य स्तरावरची प्रयोगशाळा आहे. या ठिकाणी सातत्याने अन्नघटकांची तपासणी करून घेतली जाते. प्रशासनाकडून खबरदारीचा दावा केला जात असला, तरी प्रवाशांनी सजग राहून काळजी घेतली पाहिजे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासणी आवश्‍यक आहे. त्याहीपूर्वी ते बनविण्यासाठी वापरलेले साहित्य, स्वयंपाकघर आणि पदार्थ यांची गुणवत्ता व पदार्थ तयार करणाऱ्या व्यक्तींची स्वच्छता महत्त्वाची आहे. प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या तपासणीसाठी रेल्वेने आहारतज्ज्ञांची नियुक्ती करणे आवश्‍यक आहे. प्रवाशांनी मिळालेले अन्न दर्जेदार, गरम आणि ताजे असल्याची खात्री करून घ्यावी. शक्‍यतो तळलेले पदार्थ टाळून कोरड्या पदार्थांना प्राधान्य द्यावे. सीलबंद अन्न अधिक चांगले; पण ते घेताना पॅकिंग आणि मुदत तपासून घ्यावी.
- डॉ. कविता गुप्ता, आहारतज्ज्ञ, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com