‘यात्रीगण कृपया ध्यान दे’ 

स्वाती हुद्दार
रविवार, 2 जुलै 2017

एरवी चालणेही कठीण जावे इतका गजबजलेला संत्रा मार्केटचा रस्ता, चुकार वाहन आणि एखाददुसरा पादचारीवगळता शांत होता. रेल्वेस्थानकाबाहेर ऑटोंची रांग आणि गाडी यायला वेळ असल्यामुळे ऑटोच्या मागच्या सीटवर पेंगुळलेले ऑटोचालक. दरवाजातून आत प्रवेश केल्यावर उजव्या हाताला पार्किंग. तिथल्या पोऱ्यानी दोन खुर्च्या एकमेकांना जोडून त्यावरच ताणून दिलेली. गाडीचा आवाज ऐकून तारवटलेल्या डोळ्यांनीच गाडी यहाँ नहीं वहाँ लगाओ, ऐसी काटो, आगे लो, पिछे लो... त्याच्या आदेशवजा सूचना. पार्किंगच्या बाजूला वळकट्या डोक्‍याशी घेऊन निजलेले भिकारी. त्यांच्यातून वाट काढत प्लॅटफॉर्म गाठण्याची कसरत.

एरवी चालणेही कठीण जावे इतका गजबजलेला संत्रा मार्केटचा रस्ता, चुकार वाहन आणि एखाददुसरा पादचारीवगळता शांत होता. रेल्वेस्थानकाबाहेर ऑटोंची रांग आणि गाडी यायला वेळ असल्यामुळे ऑटोच्या मागच्या सीटवर पेंगुळलेले ऑटोचालक. दरवाजातून आत प्रवेश केल्यावर उजव्या हाताला पार्किंग. तिथल्या पोऱ्यानी दोन खुर्च्या एकमेकांना जोडून त्यावरच ताणून दिलेली. गाडीचा आवाज ऐकून तारवटलेल्या डोळ्यांनीच गाडी यहाँ नहीं वहाँ लगाओ, ऐसी काटो, आगे लो, पिछे लो... त्याच्या आदेशवजा सूचना. पार्किंगच्या बाजूला वळकट्या डोक्‍याशी घेऊन निजलेले भिकारी. त्यांच्यातून वाट काढत प्लॅटफॉर्म गाठण्याची कसरत. आत शिरल्याबरोबर विशिष्ट कुबट वास नाकात शिरला. तिथले रेल्वेचे मोठ्ठे पांढरे घड्याळ ४.३५ ची वेळ दाखवत होते. रेल्वेच्या बाकड्यांवर काही प्रवासी सामानासह दाटीवाटीने बसले होते. सामान आणि दोन छोट्या मुलांसह एक जोडपे घाईघाईने आत आले. छोट्या बाळाला आईने कडेवर घेतले होते. दुसऱ्या हाताने बॅग खेचताना तिची तारांबळ उडत होती. वडिलांच्या हाताला धरून अर्धवट झोपेत असलेला थोरला कसाबसा चालत होता. 

झोपाळलेल्या डोळ्यांनी चहाच्या बूथचा पोऱ्या दुकानाचे शटर उघडत होता. शटर उघडून त्याने माझा, कोला, सोयामिल्कचे क्रेट बाहेर काढून दुकानातली गर्दी कमी केली. दुकानातले दिवे उजळले. चहाची मशीन सुरू केली. बाजूचे बुक काउंटर मात्र बंद होते. दुकानाच्या शटरसमोर एका फळीवर मळकट चादर टाकून दुकानातला पोऱ्या झोपला होता. 

इंडिकेटरवर गाडीची वेळ आणि डब्यांची पोझिशन दिसू लागली. जोडीला ‘यात्रीगण कृपया ध्यान दे’ अशी अनाउन्समेंट सुरू झाली. थोडे आधी पोहोचलेले आणि बाकड्यांवर स्थिरावलेले प्रवासी सावध झाले. काही प्रवासी धावतपळत प्रवेश करत होते. दुरून गाडीचे दिवे दिसू लागताच प्लॅटफॉर्मला गती आली. हळूच गाडीने प्रवेश केला आणि वातावरण सजीव झाले. आत शिरणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची एकच हुल्लड माजली. 

गाडीतून बाहेर पडलेले प्रवासी झोपाळलेल्या डोळ्यांनी आपले सामान तपासू लागले. त्यातच ‘चाय, गरम चाय...’च्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या. ‘थंडे पानी की बोतल’ म्हणणारे पोरे इकडेतिकडे धावू लागले. त्यांच्याकडून पाणी बोतल किंवा चहा घेऊन गाडी सुटण्याच्या आत त्यांच्याशी पैशाची देवाणघेवाण करण्याची कसरत प्रवासी करीत होते. जनरल डब्यातील मंडळी प्लॅटफॉर्मच्याच नळावरून घाईघाईने पाणी भरत होती. तेवढ्यात गाडी सुटण्याची शिटी झाली आणि एकच पळापळ करीत मंडळी गाडीत शिरली. कुणी धावत गाडी गाठली. सोडायला आलेले निरोपाचे हात हलले आणि गाडीने वेग घेतला. प्लॅटफॉर्म परत ओस, शांत. हळूहळू पुढच्या गाडीचे प्रवासी प्लॅटफॉर्मवर येऊ लागले. पुन्हा तिथले बेंच माणसांनी भरले. एक आंधळा भिकारी एकतारीवर सूर छेडत भजन गात होता.

कुणीतरी त्याच्या दिशेने नाणे फेकले. नाण्याच्या आवाजाने त्याने गाणे थांबवले आणि तो आंधळा भिकारी नाण्यासाठी जमीन चाचपडू लागला. त्याची ती तगमग बघून बेंचवरचे प्रवासी कुत्सित हसू लागले. सकाळचे साडेपाच वाजले होते. बाहेर हळूहळू उजाडू लागले होते. त्या भिकाऱ्याच्या डोळ्यातला आणि त्याच्यावर हसणाऱ्यांच्या मनातला अंधार मात्र तसाच कायम होता.