फेसबुक फ्रेण्डकडून युवतीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

युवकांमध्ये फेसबुक आणि व्हॉट्‌सॲपची क्रेझ वाढली आहे. मुलींनी अनोळखी लोकांच्या फ्रेण्ड रिक्‍वेस्ट स्वीकारू नये. व्हॉट्‌सॲपवर कुणी मॅसेज पाठवला तर त्याला उत्तरही देऊ नये. कारण, अनेक वेळा फसवणूक करणारे जाळे विणून मुलींची फसवणूक करू शकतात. भविष्यात एक चूक खूप महागात पडू शकते. त्यामुळे मुलींनी विचारपूर्वक सोशल मीडियाचा वापर करावा.
- प्रशांत भरते, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राइम

नागपूर - फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार करणाऱ्या ब्युटी पार्लरचालकाविरुद्ध सक्‍करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आशीष गोपालराव दहेलकर (वय २३, रा. खानखोजे नगर) असे आरोपीचे नाव आहे.

सक्‍करदरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २२ वर्षीय युवती शीना (बदललेले नाव) ही हुडकेश्‍वरातील संजय गांधी नगरात राहते. ती सक्‍करदरा चौकातील नामांकित महाविद्यालयात बीएससी द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. आरोपी युवक आशीष दहेलकर याचे सक्‍करदरा चौकात सलून ॲण्ड ब्युटी पार्लरचे दुकान आहे. २०१५ मध्ये दोघांचीही फेसबुकवरून ओळख झाली. दोघांनीही चॅटिंग करीत मैत्री केली. मैत्रीची मर्यादा ओलांडून दोघेही समोर गेले. १०-१५ दिवसांतच दोघेही फुटाळा तलावावर भेटले. दोघांचेही कॉलेज एकाच चौकात असल्यामुळे रोजच भेटी व्हायच्या. दोघेही प्रेमात बुडाले. सलून चालविणाऱ्या आशीषने मोठा बिझनेस करीत असल्याचे सांगून तिची फसवणूक केली. दोघांच्याही भेटीगाठी वाढल्या. त्याने शीनाला लॉजवर नेऊन लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, मैत्री करून जेमतेम एक महिन्याचाही कालावधी लोटला नसल्यामुळे तिला विश्‍वास नव्हता. त्यामुळे तिने संबंध ठेवण्यास नकार दिला. मात्र, त्याने भावनिकरीत्या लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. गेल्या दोन वर्षांपासून तो तिला आशीर्वाद नगरातील किरायाच्या खोलीवर नेऊन बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. शीनाने आईवडिलांना भेटून लग्नाची मागणी घालण्याबाबत बोलणी केली. मात्र, त्याने बिझनेससाठी बाहेरगावी जायचे सांगून टाळाटाळ केली. १२ जून रोजी त्याने घरी येऊन तिच्यावर बलात्कार केला आणि दुसऱ्या दिवशी बाहेरगावी जात असल्याचे सांगून फोन बंद केला. तिने त्याचा शोध घेण्‍याचा प्रयत्‍न केला. सक्‍करदरा चौकातून जात असताना अचानक आशीष हा सलूनच्या दुकानात दिसला. त्या वेळी तिला आशीष सलून चालक असल्याचे लक्षात आले. तिने सक्‍करदरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आशीषला अटक केली.