‘रेस्क्‍यू ऑपरेशन’ राबविताना जवान शहीद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

खापरखेडा - आसाम येथील रेस्क्‍यू ऑपरेशनमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या खापरखेडा परिसरातील एका केंद्रीय रिजर्व्ह पोलिस फोर्सच्या जवानाची प्रकृती खराब झाली. औषधोपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे शहीद मेकेलाल फूलचंद तांडेकर (वय ५३, खापरखेडा वॉर्ड क्रमांक २) या जवानाचा मृत्यू झाला.

खापरखेडा - आसाम येथील रेस्क्‍यू ऑपरेशनमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या खापरखेडा परिसरातील एका केंद्रीय रिजर्व्ह पोलिस फोर्सच्या जवानाची प्रकृती खराब झाली. औषधोपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे शहीद मेकेलाल फूलचंद तांडेकर (वय ५३, खापरखेडा वॉर्ड क्रमांक २) या जवानाचा मृत्यू झाला.

मेकेलाल तांडेकर हे मागील ३० वर्षांपासून केंद्रीय रिजर्व्ह पोलिस फोर्स दलात कार्यरत होते. तांडेकर हे गेल्या काही दिवसांपासून आसाम राज्याच्या सिल्चर येथील प्रशिक्षण केंद्रात कार्यरत होते. ते या ठिकाणी केंद्रीय रिजर्व्ह पोलिस फोर्सच्या जवानांना प्रशिक्षण देत होते. शहीद तांडेकर व त्यांचे सहकारी मित्र जवान १४७ बटालियनमध्ये कार्यरत असताना येथील जवानांनी आसाम राज्यात मुसळधार पाऊस पडल्याने बचावासाठी कार्य केले .३१ ऑगस्टला तांडेकर हे त्यांच्या मुलासोबत फोनवरून बोलले. मात्र, गुरुवारी रात्री ते कर्तव्यावर असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने केंद्रीय रिजर्व्ह पोलिस फोर्सच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्‍टरांनी त्यांची तपासणी करून मृत घोषित केले. या घटनेची माहिती खापरखेडा परिसरात पसरताच संपूर्ण परिसर शोकमग्न झाला. प्रक्रिया पार पाडल्यानंतर रविवारी सकाळच्या सुमारास विमानाने केंद्रीय रिजर्व्ह पोलिस फोर्सच्या जवानांनी शहीद मेकेलाल तांडेकर यांचा मृतदेह नागपूरला आणला. मृतदेह केंद्रीय रिजर्व्ह पोलिस फोर्स नागपूरच्या तुकडीला स्वाधीन करण्यात आला. जवळपास सकाळी साडेनऊच्या सुमारास तांडेकर यांचा मृतदेह खापरखेडा येथील त्यांच्या निवासस्थानी आणला.

यावेळी हजारोंच्या संख्येत परिसरातील जनसागर उसळला होता. कोलार घाटावर सर्व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी केंद्रीय रिजर्व्ह पोलिस फोर्सच्या जवानांनी तांडेकर यांना अखेरची २१ तोफांची सलामी दिली. तांडेकर यांच्या अंत्ययात्रेत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार सुनील केदार, केंद्रीय रिजर्व्ह पोलिस फोर्सचे कमांडर, जवान, खापरखेडा पोलिस परिसरातील जि. प., पं. स. सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. तांडेकर यांच्यापश्‍चात पत्नी, मुलगा अखिलेश, विवाहित मुलगी असा परिवार आहे. तांडेकर यांनी यापूर्वी कश्‍मीर, पंजाब, छत्तीसगड येथे कर्तव्य बजावले आहे.