मुख्य मार्गाला जोडणारे रस्ते की घसरगुंडी? 

मुख्य मार्गाला जोडणारे रस्ते की घसरगुंडी? 

नागपूर - शहरातील सिमेंट रस्ते उंच झाल्याने अनेकांची घरे खोलगट भागात गेली. या घरातून अप्रोच रोडने मुख्य मार्गावर येण्यासाठी वस्त्यांतील नागरिकांना कसरत करावी लागत आहे. सिमेंट रस्ते बांधताना कंत्राटदारांनी अप्रोच रोडला उतारही दिला नसल्याने वस्तीतून बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर अपघाताची टांगती तलवार आहे. काही ठिकाणी उंच सिमेंट रस्ते व अप्रोच रोड यांच्यातील उतार सदोष असल्याने तेथे घसरगुंडी तयार झाली असून यावरून दुचाकी काढताना नागरिकांची दमछाक होत आहे. 

शहरात ३ हजार ९६० किमीचे रस्ते आहेत. यात महापालिकेच्या २,६८२ किमी रस्त्यांसह नासुप्रचे ११२४, राष्ट्रीय महामार्ग ४३.६०, राज्य महामार्गाचे ७, इतर जिल्हा मार्गाचे ६२ तर ४१ किमीच्या रिंग रोडचा समावेश आहे. यात मुख्य मार्गांसह त्यांना जोडणाऱ्या अप्रोच रोडचाही समावेश आहे. शहरात सिमेंट रस्त्यांचे जाळे विणण्यात येत आहे. दोन टप्प्यातील मंजूर ९५ किमीच्या सिमेंट रस्त्यांपैकी ४० किमीच्या सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील जेमतेम ११ किमीचे सिमेंट रस्ते पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील ३५ रस्त्यांची कामे सुरू आहेत. पूर्ण झालेले सिमेंट रस्ते उंच झाले असून अनेक घरे, वस्त्या खाली गेल्या असल्याची नागपूरकरांची ओरड सुरू आहे. आता या सिमेंट रस्त्याला जोडणारे वस्त्यातील अप्रोच रोडच्या समस्या पुढे येऊ लागल्या आहेत. उंच सिमेंट रोड ते अप्रोच रोड, अशी घसरगुंडी अनेक वस्त्यांत तयार झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात सिमेंट रस्त्यांवरील पाणी वस्तीत शिरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय वस्त्यांतून अप्रोच रोडने सिमेंट रस्त्यांवर येताना अपघाताच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सिमेंट रस्ते तयार करताना ॲप्रोच रोडचा विचार करण्याकडे कंत्राटदारांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. उंच सिमेंट रस्त्यापासून अप्रोच रोडला एक दीड फुटाचाच उतार देण्यात आला. त्यामुळे ॲप्रोच रोडने सिमेंट रोडवर वाहने चढताना अपघात होत आहे. अनेकदा माल वाहून नेणाऱ्या चारचाकी मुख्य मार्गावर न चढल्यास मागे उभ्या असलेल्या वाहनधारकांवर परत येण्याची शक्‍यता असून एखाद्याच्या बळीनंतर पालिकेला जाग येईल काय? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

अनेक वस्त्यांतील नागरिक त्रस्त
रामेश्‍वरी येथे सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. हा सिमेंट रस्ता उंच झाला असून अप्रोच रस्ते खाली गेले आहे. याशिवाय भांडे प्लॉट चौक  ते जगनाडे चौकापर्यंतच्या सिमेंट रोडला जोडणारे सर्वच ॲप्रोच रोड धोकादायक झाले आहेत. अशाप्रकारे जेथे सिमेंट रस्ते तयार करण्यात आले, तेथे या समस्या निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे अनेक चौकांमध्ये सिमेंट रस्त्यांचा शेवट करण्यात आला. त्यामुळे चौकही खोलगट भागात गेले असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अपघातप्रवण स्थळांची निर्मिती 
मुख्य मार्गाला, सिमेंट रस्त्याला जोडणारे अॅप्रोच रोड अनेक ठिकाणी १००-१०० मीटर अंतरावर आहेत. वस्त्यांतून दुचाकीधारक किंवा चारचाकी भरधाव वेगाने वाहन मुख्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतात. सिमेंट रस्त्यांवरून योग्य उतार नसल्याने ॲप्रोच रोडने येणाऱ्या वाहनचालकाला मोठा धक्का सहन करावा लागतो. याशिवाय कुटुंबीय सोबत असल्यास दुचाकीसुद्धा मागे येण्याची शक्‍यता असून अशाप्रकारे अपघातप्रवण स्थळांची निर्मिती झाली आहे. 

नगरसेवकांना नावाची चिंता 
शहरातील अनेक मुख्य मार्गावर नगरसेवकांनी वस्तीची नावे, गल्ली क्रमांक नमुद असलेले फलक लावले आहेत. या फलकांवर नगरसेवकांनी स्वतःची नावे ठळक अक्षरात टाकली. मात्र, नगरसेवकांनी स्वतःच्या नावाचा ‘फाँट’ कमी केल्यास याच फलकावर ‘सावधान’ असे मोठ्या अक्षरात लिहिल्यास मुख्य मार्गाने वस्तीकडे जाणारा किंवा अॅप्रोच रोडने मुख्य मार्गावर येणाऱ्याच्या वेगावर नियंत्रण ठेवता येईल. परंतु नगरसेवकांना केवळ नावाचीच चिंता असल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com