सिमेंट रस्त्यांवर फोडले खापर 

सिमेंट रस्त्यांवर फोडले खापर 

नागपूर - शहरातील सिमेंट रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. अनेक रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले अन्‌ पाणी नागरिकांच्या घरांत शिरले. हे सारे सिमेंट रोड कंत्राटदारांच्या बेपर्वा वृत्तीमुळे घडल्याचे आज पुढे आले. अग्निशमन विभागाने सिमेंट रोड कंत्राटदारांना पावसाळी स्थितीत पाणी काढण्यासाठी पंप तयार ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, एकाही कंत्राटदाराने या सूचनेला गांभीर्याने घेतले नसल्याने शहरात तयार होत असलेले सिमेंट रस्ते जलमय होऊन हजारो नागरिकांच्या घरांत पाणी शिरले. आज दिवसभर महापालिकेतील दहाही झोनचे पथक या घरातील पाणी काढण्यासह तुंबलेले सिवेज, ड्रेनेज लाईन सफाईत गुंतले होते. 

शुक्रवारी झालेल्या पावसाने शहरात हाहाकार माजला असून प्रशासनही लाचार झाल्याचे दिसून आले. पावसाळ्यापूर्वी तयारीचे प्रशासनाचेही बिंग फुटले. त्यातच सिमेंट रस्ते कंत्राटदारांनी अग्निशमन विभागाच्या पाणी काढण्यासाठी पंप उपलब्ध करण्याच्या सूचनेलाही हरताळ फासला. परिणामी सिमेंट रस्ते जलमय झाले. याच सिमेंट रस्त्यांवरील पाणी नागरिकांच्या घरांत, वस्त्यांत शिरले. काही भागात, विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रिंग रोडवर ड्रेनेज लाइन तयार नसल्याने सर्व पाणी रस्त्यावर जमा झाले. सिमेंट रस्ते कंत्राटदारांसोबत महामेट्रोनेही पंपांच्या उपलब्धतेबाबत गांभीर्य दाखविले नाही. त्यामुळे कधी नव्हे तो वर्धा मार्गही पाण्याखाली आला होता. शहरात पावसाळी अधिवेशनानिमित्त सरकार, लोकप्रतिनिधी आले असून त्यांच्यापुढे उपराजधानीची नाचक्की करण्यात प्रशासनासह सिमेंट रस्ते कंत्राटदारांनीही मोठा हातभार लावल्याचे अधोरेखित झाले. 

प्रशासनाने सोडला सुटकेचा श्‍वास 
आज सकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने प्रशासनात धडकी भरली. मात्र, सकाळी साडेदहानंतर पावसाने उसंत दिल्याने प्रशासनाने सुटकेचा श्‍वास सोडला. महापालिका प्रशासनाने शहरातील वस्त्यांमध्ये पथक पाठविले असून तुंबलेल्या सिवेज लाइन, ड्रेनेज लाइन स्वच्छ करण्यात येत आहे. दहाही झोनचे सहायक आयुक्त, अभियंत्यांच्या मार्गदर्शनात महापालिकेचे पथक शहराच्या विविध भागात फिरून स्थितीवर नियंत्रण मिळवित असल्याचे आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी "सकाळ'सोबत बोलताना सांगितले. 

दिवाळीपासून ड्रेनेज, सिवेज स्वच्छता 
यावर्षी शहरातील ड्रेनेज, सिवेज लाइन सफाईची कामे ऑक्‍टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी जाहीर केला. आतापर्यंत एप्रिल-मेमध्ये स्वच्छतेला प्रारंभ केला जात होता. याशिवाय महापालिकेच्या मुख्य अभियंत्यांना दीर्घकालीन उपाययोजनासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे आयुक्तांनी नमूद केले. दीर्घकालीन उपाययोजनांसदर्भात तांत्रिक अभिप्राय देण्याची जबाबदारी मुख्य अभियंता व समकक्ष अभियंत्याकडे देण्यात आली आहे. 

नुकसानभरपाईसाठी धावपळ 
शहरात काल हजारो नागरिकांच्या घरांत पाणी शिरल्याने घरातील टीव्ही, फ्रिजसह इतर विद्युत उपकरणे, अंथरुण, अन्नधान्याचे नुकसान झाले. अनेकांच्या वाहनांत पाणी शिरले ते बिघडले. जिल्हाधिकारी कार्यालयातही जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासंदर्भात तलाठ्यापर्यंत निर्देश देण्यात आले आहे. काल झालेल्या नुकसानीसंदर्भात आज नगरसेवक प्रमोद तभाणे यांनी दोनशेवर नागरिकांच्या घराचे नुकसान झाल्याची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात दिली. याशिवाय नुकसानभरपाईसाठी इतरही अर्ज येण्यास प्रारंभ झाला. 

अनेकांनी काढली रात्र बाहेर 
शहरात काल हजारो नागरिकांच्या घरांत पाणी शिरल्याने घरातील टीव्ही, फ्रीजसह इतर विद्युत उपकरणे, अंथरुण, अन्न, धान्याचे नुकसान झाले. अनेकांच्या वाहनांत पाणी शिरल्याने ते बिघडले. दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील झोपडपट्ट्यांमध्येही शिरलेले पाणी रात्रीपर्यंत न ओसरल्याने नागरिकांनी शाळांमध्ये आसरा शोधला. त्यांना रात्र बाहेरच काढावी लागली. त्यांच्या जेवणाची व्यवस्था स्थानिक नगरसेवकांनी केली. हीच स्थिती इतरही भागात होती. काही भागात सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे करीत नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली. 

एसडीआरएफचे अतिरिक्त पथक दाखल 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराची दुरावस्था तसेच अतिवृष्टीचा इशारा बघता एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यात तयार करण्यात आलेल्या एसडीआरएफच्या (राज्य आपत्ती प्रतिसाद दल) अतिरिक्त पथकाला शहरात पाचारण केले. आज दुपारी धुळ्यावरून एसडीआरएफचे 34 जवान शहरात दाखल झाले. हिंगणा येथील एसडीआरएफच्या बेस कॅम्पमध्ये 110 जवान असून त्यात आता 34 जणांची भर पडली. आपत्कालीन स्थितीत या पथकाचे सहकार्य घेतले जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com