मनोरुग्णालयात सारेच डॉक्‍टर वेळेत हजर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

नागपूर - प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाची कुलपे सकाळी आठपूर्वी उघडल्यानंतर मनोरुग्णांची गर्दी होऊ नये यासाठी मानसोपचारतज्ज्ञांसहित सामाजिक कार्यकर्ते, परिचारिका, फार्मासिस्ट आणि कर्मचाऱ्यांनी वेळत हजर व्हावे, असे निर्देश मनोरुग्णालय प्रशासनाने मंगळवारी (ता. ३१) दिले.

दै. ‘सकाळ’ने ‘प्रादेशिक मनोरुग्णालयात सारेच लेटलतीफ’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि तासभर उशिरा येणारे डॉक्‍टर आठ ते साडेआठ वाजता मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कर्तव्यावर हजर झाले. मनोरुग्णालयात सकाळी ८ वाजता बाह्यरुग्ण विभाग सुरू होतो. परंतु, नऊच्या ठोक्‍यानंतर कामकाजाला सुरुवात होते. दिवसाला ‘अहो, डॉक्‍टर वेळेवर या...’ म्हणून शेकडो मनोरुग्ण डॉक्‍टरांना विनवणी करतात. 

मात्र, ‘सकाळ’ने प्रकाशित केलेल्या वृत्तामुळे मनोरुग्णांना होणारा त्रास डॉक्‍टर तसेच कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. एस. फारुखी यांनी वृत्ताची दखल घेत मंगळवारी दुपारी डॉक्‍टर, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व इतर कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याची नोटीस जारी केली. जे कर्मचारी वेळेवर येणार नाहीत, त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दीड तासात गर्दी कमी 
दै. ‘सकाळ’च्या बातमीमुळे मंगळवारी मानसोपचारतज्ज्ञांसहित सर्व विभागांतील कर्मचारी सकाळी ८ ते ८.३० वाजता प्रादेशिक मनोरुग्णालयात हजर झाले. यामुळे सकाळीच मनोरुग्णांवर उपचार सुरू झाल्यामुळे अवघ्या तास-दीड तासात मनोरुग्णांची गर्दी ओसरली. डॉक्‍टरांनी वेळेवर आणि एकत्रित काम केल्यामुळे मनोरुग्णांची गर्दी उसळल्याचे चित्र प्रथमच मनोरुग्णालयात दिसले नसल्याची पावती खुद्द कर्मचाऱ्यांनी दिली.