नागपूरकरांसाठी राष्ट्रीय दर्जाचा संगीत महोत्सव

नागपूरकरांसाठी राष्ट्रीय दर्जाचा संगीत महोत्सव

नागपूर - खासदार चषक कबड्डी किंवा खो-खो स्पर्धा होतात. पण, नागपूरकरांसाठी माझ्या वतीने एक राष्ट्रीय दर्जाचा संगीत महोत्सव आयोजित करण्याचा मी निर्णय घेतला. कलावंतांच्या तारखा मिळाल्या तर पुढच्याच महिन्यात त्याचे आयोजन होईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज (रविवार) केली. तीन दिवसांच्या कालिदास समारोहाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते.

रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात आयोजित तीनदिवसीय महोत्सवाचा विक्रमी गर्दीच्या साक्षीने समारोप झाला. या सोहळ्याला महापौर नंदा जिचकार, संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी, पं. रोणु मुजुमदार, पं. सतीश व्यास, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महापालिका आयुक्त अश्‍विन मुद्‌गल यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. गडकरी म्हणाले, ‘‘सभागृहातील उपस्थिती बघून नागपूर महानगरपालिकेची मेहनत सार्थकी लागली असे सिद्ध होते. एवढे मोठे सभागृह बांधणे फार अवघड काम आहे. पण, आमच्या हट्टामुळे त्यांनी हे काम पूर्णत्वास नेले. आता या ठिकाणी नागपूरचे संगीत, साहित्य, नाट्य उपक्रम सातत्याने होतील, तेव्हाच त्याची उपयोगिता अधिक मोठ्या प्रमाणात सिद्ध होईल. नागपूरमध्ये राष्ट्रीय दर्जाचा संगीत महोत्सव आयोजित करण्याचा माझ्या मनात विचार आला, तेव्हा अनेक कलावंतांशी बोललो. अद्याप तारखा निश्‍चित व्हायच्या आहेत.’’ त्याचसोबत एक राष्ट्रीय दर्जाचे हास्य कविसंमेलन या सभागृहात घेण्याची घोषणाही त्यांनी केली. या कार्यक्रमांमध्ये ज्यांना रस आहे, त्यांनीच यावे, असा आमचा प्रयत्न राहणार आहे. नाहीतर या कार्यक्रमांना राजकीय सभांसारखे स्वरूप येईल. त्याची सोय म्हणून निःशुल्क ऑनलाइन नोंदणीचा प्रयोग आयुक्त करणार आहेत, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले. या सभागृहात गाण्यांच्या कार्यक्रमासाठी अरिजित सिंहला विचारण्याचा आम्ही प्रयत्न केला; पण तो खूप पैसे घेतो असे कळले. त्यामुळे गायक अभिजितला बोलावण्याचा प्रयत्न करतोय, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक अनुप कुमार यांनी केले. संचालन रेणुका देशकर व जैनेंद्र सिंह यांनी केले. या वेळी महोत्सवाच्या आयोजनात योगदान देणारे स्वप्निल व श्‍वेता पंचभाई, संदीप बारस्कर, झहीर खान, शुभांगी गडेकर, जैनेंद्र सिंह आणि रेणुका देशकर यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बासरी अन्‌ संतूरची जुगलबंदी
समारोप सोहळ्यानंतर संतूरवादक पद्मश्री पं. सतीश व्यास आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पं. रोणु मुजुमदार यांच्या जुगलबंदीचा ना. नितीन गडकरी व कांचन गडकरी यांच्यासह सर्व रसिकांनी आस्वाद घेतला. यमन रागाने सुरुवात करून आलाप जोड आणि त्यानंतर झपतालात रचना सादर केली. पं. मुकुंदराज देव आणि पं. रामदास परसुले यांनी तबल्यावर साथ दिली. या सभागृहात आल्यावर आपण लंडनच्या एखाद्या सभागृहात परफॉर्म करीत असल्याचा फील येतोय, अशी दाद पं. सतीश व्यास यांनी दिली. कार्यक्रमानंतर बिंदू जुनेजा आणि समूहाचे ओडिसी नृत्य झाले. तर, रात्री उशिरा पं. संजीव अभ्यंकर आणि अश्विनी भिडे-देशपांडे यांची शास्त्रीय गायनाची जुगलबंदी सादर झाली. मुख्य म्हणजे, रात्री उशिरापर्यंत सभागृहात प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती होती.

कालिदास महोत्सवात विक्रमी गर्दीची नोंद 
१९९६ पासून आयोजित होत असलेल्या कालिदास समारोहात आज विक्रमी गर्दीची नोंद झाली. देशपांडे सभागृहात चारशे प्रेक्षकही उपस्थित नसायचे. मात्र, विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी समारोहाला पुनरुज्जीवन दिल्याने प्रेक्षक ओढले गेले. गेली तीन वर्षे सातत्याने या महोत्सवाला गर्दी होत आहे. आज मात्र सुरेश भट सभागृहात गर्दीने उच्चांक गाठला. दोन हजार आसनक्षमतेचे सभागृह ‘हाउसफुल्ल’ झाल्यानंतरही जवळपास पाचशे प्रेक्षकांचा जागा मिळविण्यासाठी संघर्ष सुरू होता. काहींनी पायऱ्यांवर बसून कार्यक्रम बघितला; तर काहींनी प्रवेशद्वाराजवळ असलेल्या एलईडीवरच समाधान मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com