संत जगनाडे महाराजांच्या स्मारकासाठी एक कोटी

संत जगनाडे महाराजांच्या स्मारकासाठी एक कोटी

नागपूर - समाजाला नवी दिशा देणाऱ्या व वाईट चालीरितींवर प्रहार करणाऱ्या तुकाराम महाराजांची गाथा काही वाईट प्रवृत्तींच्या लोकांनी संपवण्याचे काम त्याकाळी केले. परंतु, संत जगनाडे महाराजांनी तुकारामांची गाथा लिहून काढून समाजाला मोठी देणगीच दिली आहे. अशा संतांचे उत्कृष्ट स्मारक करण्यासाठी एक कोटीचा निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

जगनाडे चौक येथे आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी स्मरण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर नंदा जिचकार, खासदार कृपाल तुमाने, जोगेंद्र कवाडे, कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, बाबूलाल वंजारी तसेच स्मारक समितीचे अध्यक्ष बंसीलाल चौधरी होते.

समाजाला दिशा दाखविण्याचे काम करणारे संत हे समाजासाठी दीपस्तंभासारखे असतात. त्यांचे विचार समाजाला कायम योग्य मार्ग दाखवतात. अशा संतांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी यासाठी शासनाने जगनाडे महाराजांच्या स्मारकासाठी जागा दिली. ही जागा खुल्या प्रकारात मोडत असल्यामुळे तिथे चटई क्षेत्र लागू होत नाही. परंतु, जगनाडे महाराजांनी समाजासाठी काय केले याची जाणीव समाजाला व्हावी म्हणून स्मारकाच्या ठिकाणीच आर्ट गॅलरी होण्यासाठी नियमात काही बदल करावे लागतील. ते निश्‍चितपणे करण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी आमदार कृष्णाजी खोपडे यांच्यावर सोपवली.

यावेळी जयदत्त क्षीरसागर यांनी मन, माणूस आणि माणुसकी जागृत ठेवण्याची शिकवण देणाऱ्या जगनाडे महाराजाचे स्मारकात आर्ट गॅलरी होण्याची इच्छा व्यक्त केली. महापौर नंदा जिचकार, आमदार जोगेंद्र कवाडे व आमदार कृष्णा खोपडे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा स्मारक समितीच्या सदस्यांनी सत्कारही केला. कार्यक्रमाला हरीश गोरडे, हरीश दिकोंडवार, दिव्या धुरडे, उमेश साहू व डॉ. रवींद्र भोयर होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com