मेयोतील सुरक्षाव्यवस्था झोपली!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

रुग्णांच्या नातेवाइकांच्या जेवणावर ताव
मेयो परिसरात रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी अनेक स्वंयसेवी संस्थांतर्फे मोफत जेवण दिले जाते. यावेळी मेयोतील सुरक्षारक्षकही मोठ्या प्रमाणात या जेवणावर ताव मारतात.

नागपूर - काही दिवसांपूर्वी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) उपचारासाठी आलेल्या दारुड्याने मध्यरात्री अडीचला डॉ. अभिनव कुमार यांना शिवीगाळ करीत हातात कैची घेऊन अंगावर धावून गेला आणि ठार मारण्याची धमकी दिली होती. हे प्रकरण ताजे असतानाही मेयोची सुरक्षाव्यवस्था मध्यरात्री अशी झोपलेली असते. एकही सुरक्षारक्षक जागा नसतो. मध्यरात्री मेयोत रुग्णाला भरती करण्यासाठी आणले असताना सुरक्षारक्षक झोप काढत असल्याचे ‘स्टिंग’ एका वाचकाने पुढे आणले आहे.

धुळे येथे चार महिन्यांपूर्वी एका निवासी डॉक्‍टरला बेदम मारहाण झाली. त्यानंतर राज्यात डॉक्‍टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी शासनाने डॉक्‍टरांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली. ५० कोटींचा खर्च सहन करीत राज्यातील १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत डॉक्‍टरांच्या सुरक्षेत वाढ केली. 

मेयो रुग्णालयात वर्षाला ५० लाखांपेक्षा जास्त सुरक्षेवर खर्च केले जातात. असे असताना मेयोतील सुरक्षारक्षक असे बिनधास्त रात्री झोप घेतात. यामुळेच रात्री अडीचला एखाद्या रुग्णाचा नातेवाईक परिचारिकेच्या हातात असलेल्या ‘ट्र’मधून कैची उचलतो आणि डॉक्‍टरच्या अंगावर धावून जातो. डॉक्‍टरांवर हल्ला होत असताना सुरक्षारक्षक पसार होत असतात, असे नेहमीचे चित्र असते. मेयोत वर्षभरात पाचवेळा निवासी डॉक्‍टरांवर हल्ले झाले आहेत. कॅज्युअल्टी, प्रसूती विभाग असो की, स्टाफ पार्किंगचा परिसर असो की, मुलींच्या वसतिगृहात तैनात असलेले सुरक्षारक्षक असो, ते झोपलेले असतात. यामुळेच सुरक्षाव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहे.