शिल्पा अग्रवाल ठरल्या ‘मिसेस युनिव्हर्स लव्हली’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

नागपूर - प्रसिद्ध उद्योजिका शिल्पा अग्रवाल ‘मिसेस युनिव्हर्स लव्हली २०१७’च्या मानकरी ठरल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतील दरबान येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत त्या सहभागी झाल्या होत्या. जगभरातून आलेल्या १८४ महिला स्पर्धकांना मागे टाकत त्यांनी हा किताब पटकाविला.  

नागपूर - प्रसिद्ध उद्योजिका शिल्पा अग्रवाल ‘मिसेस युनिव्हर्स लव्हली २०१७’च्या मानकरी ठरल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतील दरबान येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत त्या सहभागी झाल्या होत्या. जगभरातून आलेल्या १८४ महिला स्पर्धकांना मागे टाकत त्यांनी हा किताब पटकाविला.  

दरबान येथे २४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान झालेल्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या त्या एकमात्र नागपूरकर आहेत. अत्यंत प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत शिल्पा अग्रवाल यांनी विविध फेऱ्यांमध्ये स्वत:च्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला. त्या ‘मिसेस युनिव्हर्स लव्हली’ किताब पटकाविणाऱ्या मध्य भारतातील पहिल्या महिला आहेत. ‘महिला सक्षमीकरणातून परिवर्तनाचा उदय’ अशी या स्पर्धेची थीम होती. स्पर्धेत २१ ते ४५ वर्षे वयोगटातील १८४ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यात टीव्ही कलाकार, मॉडेल, समाजसेविका, उद्योजिका आदींचा समावेश होता. स्पर्धेंतर्गत असलेल्या सांस्कृतिक फेरीदरम्यान अग्रवाल यांनी मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवीत ‘मला जाऊ द्या ना घरी...’ या गाण्यावर लावणी नृत्य सादर केले. स्पर्धेची अंतिम फेरी २ सप्टेंबर रोजी झाली. त्यात अग्रवाल यांना ‘मिसेस युनिव्हर्स लव्हली’ घोषित करण्यात आले.

अग्रवाल यांनी यापूर्वी मॅनमारमध्ये झालेल्या मिसेस इंडिया वर्ल्ड वाइड स्पर्धेचा मिसेस इन्स्पिरेशनल किताब आपल्या नावावर केला. याशिवाय वर्ष २००४ मध्ये झालेल्या ‘मिसेस नागपूर’ आणि पती आकाश अग्रवाल यांच्यासोबत २००५ मध्ये ‘मि. ॲण्ड मिसेस अग्रवाल’ किताब त्यांनी मिळविला आहे. 

प्रेरणादायी प्रवास
आज एक प्रसिद्ध उद्योजिका म्हणून प्रख्यात असलेल्या शिल्पा अग्रवाल यांच्या आयुष्याचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. कमी वयात लग्न झालेल्या एका निरक्षर मुलीपासून ते मध्य भारतातील नावाजलेल्या उद्योजिकापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्या आकाश फर्निचर ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. समाजसेवेच्या माध्यमातून त्या महिलांच्या उत्थानासाठी कार्यरत आहेत.