सेनेने जाळला शेलारांचा पुतळा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

नागपूर -  सत्तेत भागीदार राहूनही एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या शिवसेना व भाजपमधील संघर्ष आता रस्त्यांवर दिसून येत आहे. शिवसेना व प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याप्रकरणी शहरातील शिवसैनिकांनी आज मानेवाडा चौकात मुंबई भाजपचे आमदार आशीष शेलार यांचा पुतळा जाळला. अमरावतीचे आमदार रवी राणा यांचाही पुतळा आगीच्या हवाली करीत सेनेने त्यांच्यावरही नाऱ्यांच्या माध्यमातून शाब्दिक बाण सोडले. या आंदोलनामुळे काही काळ या परिसरात तणाव निर्माण झाला. 

मुंबईत रस्त्यावर येऊन महागाईविरोधात आंदोलन केल्यामुळे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी ‘खाल्ल्या ताटात घाण करणारे’ अशा शब्दात सेनेच्या प्रमुख नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे त्यांच्या टीकेला आज नागपुरातील शिवसेनेनेही आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले.  मानेवाडा चौकात सकाळी साडेअकराच्या सुमारास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश हरडे, भंडारा जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख दीपक शेंदरे, रविनीश पांडे, नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी ‘आशीष शेलार हाय हाय’, ‘शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है’, अशा घोषणा देत शेलारांचा पुतळा जाळला. येत्या काही दिवसांत शिवसेना फुटणार असून २२ आमदार शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत असल्याचे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले होते. त्यांच्याही वक्तव्याचा समाचार शिवसैनिकांनी घेतला. त्यांच्याही नावाने शिमगा करीत शिवसैनिकांनी त्यांचाही पुतळा जाळला. यावेळी शिवसैनिकांनी ‘रवी राणा मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उपकार आशीष शेलार यांनी विसरू नये, असेही हरडे यावेळी म्हणाले. आमदार राणा नागपुरात येत असताना नागपूरजवळील वाडी येथे त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र आमदार राणा यांच्या गाडीवर दगडफेक केल्याच्या घटनेचा इन्कार केला आहे. शिवसैनिक मागून वार करणारे मावळे नाहीत. शिवसैनिकांनी ठरविल्यास राणांना महाराष्ट्रातून सळो की पळो करून सोडू, असा इशारा नागपूर जिल्हा शिवसेना प्रमुख सतीश हरडे यांनी दिला.

Web Title: nagpur news shiv sena bjp