स्मार्ट सिटीच्या कामांना मार्चचा मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

नागपूर, ता. २५ ः स्मार्ट सिटीतील एरिया बेस डेव्हलपमेंटअंतर्गत पूर्व नागपुरातील १७३० एकर परिसरातील विकासकामांना मार्च २०१८ मध्ये सुरुवात होणार आहे. स्मार्ट सिटी मिशनचे संचालक व केंद्रीय नगरविकास विभागाचे अतिरिक्त सचिव समीर शर्मा यांनी नुकताच शहरातील एरिया बेस डेव्हलपमेंटअंतर्गत वाढीव क्षेत्रफळाला मंजुरी दिली असून, आता १७३० एकरात स्मार्ट सिटी योजनेतील कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कामाच्या प्रगतीबाबत नुकताच मुंबईत केंद्रीय नगरविकास विभाग  सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी आढावा घेतला. या बैठकीत केंद्रीय नगरविकास विभागाचे अतिरिक्त सचिव व स्मार्ट सिटी मिशनचे संचालक समीर शर्मा, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, राज्य शासनातील अधिकारी उपस्थित होते. पूर्व नागपुरातील भरतवाडा, पारडी, पुनापूर या भागातील ९५१ एकरांत स्मार्ट सिटी योजनेतील एरिया बेस डेव्हलपमेंटअंतर्गत विकासाचे प्रस्तावित होते. मात्र, यात भांडेवाडीसह आणखी काही परिसराचा समावेश करण्यात आला. त्यामुळे एरिया बेस डेव्हलपमेंटअंतर्गत स्मार्ट सिटी योजनेच्या कामांचे क्षेत्रफळ १७३० एकरापर्यंत वाढले. नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या संचालकांनी या वाढीव क्षेत्रफळाला  मंजुरी दिली होती. परंतु, केंद्रीय नगरविकास विभागाच्या मंजुरीसाठी घोडे अडले होते. शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत केंद्रीय नगरविकास विभाग सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी आढावा  घेतला. या बैठकीत केंद्रीय नगरविकास विभागाचे अतिरिक्त सचिव व स्मार्ट सिटी मिशनचे संचालक समीर शर्मा यांनी या वाढीव क्षेत्रफळाला मंजुरी दिली. सध्या टाऊन प्लानिंगनुसार डीपीआर तयार करण्यात येत असून डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. जानेवारीत या परिसराच्या विकासासाठी एजन्सी नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मार्च २०१८ पासून  प्रत्यक्षांत कामांना प्रारंभ होणार आहे. याशिवाय या परिसरात वायफाय हबच्या डीपीआरबाबतही चर्चा झाली. 

Web Title: nagpur news smart city