हास्याचे फव्वारे अन्‌ अंतर्मुख करणारे संवाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

नागपूर - एकामागून एक घडत जाणाऱ्या गमती-जमती, त्यातून सभागृहात उडणारे हास्याचे फव्वारे आणि त्याचवेळी सामाजिक संदेश देत अंतर्मुख करणारे संवाद याचा एकत्रित अनुभव ‘अस्सा नवरा नको गं बाई’ या नाटकातून रसिकांनी घेतला. ‘सकाळ सोशल कल्चरल क्‍लब’ आणि नवराव येथील श्रीव्यंकटेश नाट्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला.

नागपूर - एकामागून एक घडत जाणाऱ्या गमती-जमती, त्यातून सभागृहात उडणारे हास्याचे फव्वारे आणि त्याचवेळी सामाजिक संदेश देत अंतर्मुख करणारे संवाद याचा एकत्रित अनुभव ‘अस्सा नवरा नको गं बाई’ या नाटकातून रसिकांनी घेतला. ‘सकाळ सोशल कल्चरल क्‍लब’ आणि नवराव येथील श्रीव्यंकटेश नाट्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला.

उत्कर्ष असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेला साहाय्य करण्यासाठी सिव्हिल लाइन्स येथील स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात या नाटकाचे आयोजन करण्यात आले. पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी उपस्थित राहून कलावंत व आयोजकांशी संवाद साधला. रामराव टेलरच्या सुखी कुटुंबाभवती या नाटकाचे कथानक फिरते. रामरावच्या पत्नीचे निधन झालेले असते. त्यामुळे दोन मुली आणि एका मुलांना तो कष्ट करून सांभाळतो. मोठी मुलगी अभ्यासात हुशार तर लहान बारावीच्या परीक्षेला तीनवेळा बसलेली. मोठ्या मुलाला कवितेचा छंद असतो, पण नोकरीची सोय नसते. त्यामुळे मुलींची लग्न लावून ओझं उतरविण्याचा रामरावचा आटापिटा असतो. मोठीला बघण्यासाठी पाहुणे येणार असतात तेव्हाच धाकट्या मुलीने मुलासोबत पळून लग्न केल्याचे कळते आणि रामराव खचतो. काही दिवसांनी मुलगी परत येते, पण रामरावचा राग गेलेला नसतो. या नाटकात दोन्ही मुली, सरपंच बाई व तिचा नवरा यांच्या मिश्‍कील स्वभावातून घडणारे विनोदी प्रसंग प्रेक्षकांना पोट धरून हसवतात. विशेषतः सरपंच बाईचा नवरा आणि नाटकातील बोलीचा लहेजा विशेष भाव खाऊन जातो. त्याचवेळी ‘अशिक्षितांची राणी होण्यापेक्षा मेहनत करणाऱ्याची दासी होईन’ यासारखे मुलीचे संवाद टाळ्याही घेऊन जातात. अंधश्रद्धेवर प्रहार करणारेही संवाद यात आहेत. नाटकाचे लेखक-दिग्दर्शक सदानंद बोरकर, विजय मुळे, देवयानी जोशी, शीतल राऊत, चंद्रसेन लेंझे, विश्‍वनाथ पर्वते, अंगराज बोरकर, कमलाकर कामडी, पराग सहारे आणि मंजूषा जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

सामाजिक उद्देश
उत्कर्ष असोसिएशन फॉर ब्लाइंडच्या राधा ईखनकर-बोराडे यांनी अंध विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे बांधकाम सुरू केले आहे. त्यासाठी या नाटकाचे आयोजन करण्यात आले. यातून उभा होणारा निधी वसतिगृहाच्या उभारणीसाठी देण्यात येणार आहे. 

‘तू तिथे असावे’चे आज पोस्टर लाँचिंग 
जी. कुमार पाटील एंटरटेमेंटतर्फे ‘तू तिथे असावे’ या चित्रपटाची निर्मिती होत आहे. शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी साडेसात वाजता देशपांडे सभागृह, सिव्हिल लाइन्स येथे चित्रपटाच्या पोस्टरचे लॉचिंग होणार आहे. पोस्टर लॉचिंगच्या कार्यक्रमाला महापौर नंदाताई जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, खासदार कृपाल तुमाणे, जयंतराव पेंढारकर, संदीप जोशी उपस्थित राहतील. उद्‌घाटनानंतर सायंकाळी हिंदी- मराठी गाण्याचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात ‘सकाळ सोशल कल्चरल क्‍लब’ माध्यम प्रायोजक आहे.