शहराच्या विकासाचा वेध घेणारा आराखडा पण.... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

नागपूर - महापालिकेने यापूर्वीही अनेक विकास आराखडे तयार केले. मात्र, त्यावर अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी तयार केलेला 34 हजार कोटींचा विकास आराखडा भविष्यातला शहराचा वेध घेणारा असला तरी त्याची वाटचालही रद्दीकडे जाणारीच असल्याचा टोमणा अनेकांनी मारला. केवळ मोठमोठ्या आकड्यांचे आराखडे तयार करणे, त्यासाठी सल्लागाराला कोट्यवधी रुपये देणे एवढेच काम महापालिका करीत असल्याची टीकाही अनेकांनी केली. 

"सकाळ'ने आज "34 हजार कोटींच्या आराखड्यावर धूळ' या मथळ्याचे विशेष वृत्त प्रकाशित केले. या वृत्तातून महापालिकेला शहराच्या विकास आराखड्याचा विसर पडला असून, पहिल्या टप्प्यातील कामांनाही प्रारंभ झाला नसल्याकडे लक्ष वेधले. 2041 पर्यंत संत्रानगरीत अत्याधुनिक सुविधेसह रस्ते, शैक्षणिक संस्था, आरोग्य संस्था, पर्यटन विकासावर 34 हजार 604 कोटी खर्च केले जाणार आहेत. पहिल्या सात वर्षात 2021 पर्यंत 27 हजार 350 तर त्यापुढील वीस वर्षांत टप्प्याटप्प्याने 7 हजार 253 कोटी खर्च केले जातील. पहिल्या सात वर्षांतील कामे भविष्यातील शहराच्या विकासाचा पाया ठरणार आहे. मात्र, हा आराखडाच धूळखात असल्याकडे यातून लक्ष वेधले होते. फेसबुक, व्हॉट्‌सऍप, ट्‌विटर यावर या वृत्ताची "नेटिझन्स'नी दखल घेतली. अनेकांनी महापालिकेवर दोषारोपण केले तर काहींनी महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

महापालिकेने यापूर्वीही नाग नदी, पिवळी नदीचा विकास आराखडा तयार केला. यावर चर्चाही भरपूर झाली. केंद्राकडेही पाठविला. मात्र, या आराखड्याचा केंद्र व राज्याने फुटबॉल केला. सद्य:स्थितीत नाग नदीच्या आराखड्याकडेही कुणाचे लक्ष नाही. तसेच या आराखड्याचेही होईल. 
- सचिन कोसे 

34 हजार कोटींचा विकास आराखडा चांगला आहे. शहराच्या विकासाचा वेध घेणारा आहे. मात्र, महापालिकेकडे पैशाची चणचण आहे. सध्या अनुदानावरच महापालिकेची मदार आहे. परंतु, भविष्यात स्थिती सुधारेल व या आराखड्यावर अंमलबजावणी होईल. 
- संजय डांगरे 
 
विकास आराखडा तयार करण्यासाठी महापालिका एजन्सीला नियुक्त करते. या एजन्सीला बक्कळ पैसा दिला जातो. त्यामुळे किमान महापालिकेने विकासाचा आराखडा तयार करताना अंमलबजावणीबाबत स्वतःची क्षमता बघावी. 
- विवेक तायवाडे 

सल्लागार कंपन्यांचे पोट भरण्यासाठीच अशाप्रकारचे विकास आराखडे तयार केले जातात. 
- आलोक कोंडापूरवार