सोमलवारचा आदित्य टॉप

सोमलवारचा आदित्य टॉप

नागपूर - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारी (ता. १३) जाहीर करण्यात आलेल्या दहावीचा निकालात सोमलवार रामदासपेठ शाळेचा आदित्य लोटे याने ९८.६० टक्के गुणांसह शहरात प्रथम, तर विदर्भात दुसरे स्थान पटकाविले. दहावीच्या निकालात इतर निकालांप्रमाणे मुलींनी बाजी मारली असली तरी गुणवंतांच्या यादीत यंदा मुलांनी आगेकूच केली आहे. 

मंगळवारी दुपारी एक वाजता निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये धाव घेतली. यंदा प्रथमच बोर्डाने क्रीडा आणि कलावंत विद्यार्थ्यांनाही वाढीव गुण दिले. त्यामुळे अनेक महाविद्यालयांमधील विद्यार्थी १०० टक्‍क्‍यांहून अधिक आल्याचे दिसून आले. परंतु, काही वेळातच गुणवत्ता यादीमध्ये वाढीव गुण नसणाऱ्या मुलांचा समावेश असल्याचे बोर्डाने सांगितले.

 त्यानुसार शहरातून आदित्य लोटे प्रथम तर सोमलवार रामदासपेठची विद्यार्थिनी राधिका ढोक हिने ९८.४० टक्‍क्‍यांसह दुसरे स्थान मिळविले. त्यांच्या पाठोपाठ रमना मारोती येथील जे.पी. इंग्लिश स्कूलच्या प्रांजन भोयर याने ९८.२ टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकाविला आहे. या शिवाय ९८ टक्के गुण मिळवत अलिशा खोब्रागडे आणि अभिषेक आष्टनकर यांनी चौथे येण्याचा मान पटकाविला. यंदाच्या निकालात मुलींची टक्केवारी वाढली असली तरी गुणवत्ता यादीत मुलांनी बाजी मारली आहे.

व्हिडिओ गेम्स खेळून टॉप - आदित्य
नववीचा निकाल लागला की, आई-वडील मुलांना टीव्ही, खेळ आणि सोशल मीडियापासून लांब ठेवतात. मात्र, सोमलवार रामदासपेठ शाळेतील आदित्य उमेश लोटे हा विद्यार्थी अपवाद ठरला आहे. दररोज न चुकता दोन तास व्हिडिओ गेम आणि सोशल मीडियावर ॲक्‍टिव्ह असलेल्या आदित्यने दहावीच्या परीक्षेत ९८.६ टक्के गुणांसह शहरातून पहिला येण्याचा मान पटकावला. आदित्यचे वडील उमेश लोटे हे ‘एव्हरेडी इंड्रस्ट्रीज’मध्ये व्यवस्थापक, तर आई वंदना पोलिस विभागात आहे. आई-वडील दोघेही आपल्या कामात व्यस्त असले तरी, मुलाच्या अभ्यासाकडे त्यांचे व्यवस्थित लक्ष होते. आदित्यने सुरुवातीपासूनच अभ्यासाचे कधीच टेन्शन घेतले नाही. तो व्हॉटस्‌ॲप, फेसबुकवर कमालीचा ‘ॲक्‍टिव्ह’ आहे. सोबतच दिवसाचे दोन तास व्हिडिओ गेम खेळायचा. मात्र, नियमित अभ्यासही त्याने केला. दिवसाचे दोन तास पूर्णपणे एकचित्त होऊन तो अभ्यास करीत असे. विशेष म्हणजे दहावीसाठी त्याने क्‍लासेस लावले नव्हते. आप्तेष्टांच्या आग्रहास्तव ‘क्रॅश कोर्स’ केला. निकाल कळल्यानंतर अंबाझरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या त्याच्या आईने थेट गणवेशात शाळा गाठली. मुलाचे यश पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.

सोशल मीडियापासून लांब - राधिका
दहावीच्या परीक्षेत ४९८ गुण (९८.४० टक्के) प्राप्त करणाऱ्या सोमलवार रामदासपेठ शाळेतील राधिका योगेश ढोक हिला सोशल मीडिया फारसा आवडत नाही. दहावीचे महत्त्वपूर्ण वर्ष असल्यामुळे सोशल मीडियापासून ती बुद्धिपुरस्सरपणे लांब राहिली. तिचे वडील योगेश ढोक हे नागपूर नागरिक सहकारी बॅंकेत कार्यरत असून, आई शैला ढोक या गृहिणी आहेत. दररोज सुमारे दोन ते तीन तास अभ्यास करणाऱ्या राधिकाला संस्कृत आणि जीवशास्त्र विषयात विशेष रस आहे. दहावीचे वर्ष असले तरी तिने अभ्यासाचा फारसा ताण घेतला नाही. कुठल्याही गोष्टीचा ताण घेतला की त्यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे तिचे मत आहे. नियमित अभ्यास आणि केलेल्या अभ्यासाची उजळणी ही तिच्या यशाची गुरुकिल्ली आहे. जीवशास्त्र हा आवडता विषय असून, बारावीनंतर मेडिकलला जाण्याचा तिचा मानस आहे.

प्रशासकीय सेवेत जाणार - प्रांजन
नियमित अभ्यासामुळे दहावीत यश मिळाले. यापुढे अभियांत्रिकी शाखेतून पदवी पूर्ण करायची असून, भविष्यात प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा जे. पी. इंग्लिश स्कूल रमणामारोती येथील विद्यार्थी प्रांजन भोयर याने व्यक्त केली. दहावीमध्ये ९८.२० टक्के गुण मिळवत तो शहरातून तिसरा आला आहे. कधीही ठरवून अभ्यास केला नाही. मात्र वाचनाची आवड असल्याने सहज अभ्यास झाला. या यशामध्ये परिवार आणि शाळेचा वाटा असल्याचे प्रांजन सांगतो.

डॉक्‍टर होणार - अब्दुल 
माझे वडील अभियंते आहेत. मात्र, मला डॉक्‍टर बनण्याची इच्छा असून, त्या दिशेने प्रवास सुरू असल्याचे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांमधून ९४.४० गुणांसह प्रथम आलेल्या अब्दुल रहमान याने सांगितले. दहावीचा अभ्यासक्रम हा फार कठीण नाही. नियमित अभ्यास केला की यश हे नक्कीच मिळते असे अब्दुल सांगतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com