‘ज्वालामुखी’ भडकलाच नाही!

‘ज्वालामुखी’ भडकलाच नाही!

नागपूर - एखाद्या संवेदनशील विषयाची मांडणी आणि सादरीकरण योग्य झाले नाही, तर तो प्रेक्षकांपर्यंतही व्यवस्थित पोहोचत नाही. तसाच काहीसा प्रकार काल (गुरुवार) राज्य नाट्य स्पर्धेत अनुभवायला मिळाला. ‘ज्वालामुखी’ असे नाव नाटकाला देण्यात आले, मात्र शेवटपर्यंत तो भडकलाच नाही. 

लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सोसायटीच्या सभागृहात ही स्पर्धा सुरू आहे. कृती थिएटर ॲण्ड स्पोर्टस्‌ अकादमीच्या वतीने या दोन अंकी नाटकाचा प्रयोग सादर झाला. शितल दोडके यांचे लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य आणि मुख्य भूमिका या नाटकात होते. स्वतः शितल दोडके, रुबीच्या भूमिकेत असलेली संस्कृती रंगारी आणि मोजक्‍या वेळासाठी रंगमंचावर आलेला रोशन खोब्रागडे यांचा अपवाद वगळला तर अभिनयाच्या अंगाने कुणीही स्वतःला सिद्ध करू शकले नाही. अर्थात अख्खे नाटक एकट्याच्या जोरावर ओढण्यातही शितल दोडके अपयशी ठरले, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. पूर्णवेळ संभ्रमात असलेले संगीत नाटकाची सर्वांत कमकुवत बाजू ठरली. लाईट बंद होण्यापूर्वीच विंगेत निघून जाणे आणि लाईट आल्यावर पोजीशन घेणे या दोन चुका अनेक कलावंत सातत्याने करताना आढळले. नागपुरातील एक सर्वसामान्य मुस्लीम कुटुंब मुंबईत आल्यावर एक घटना घडते. दोन धर्मांमध्ये दंगे होतात आणि त्यातच सारे अस्ताव्यस्त होतात. जोरदार फायरिंग झाल्यामुळे दहशतवादी हल्ला झाला आहे, असा सर्वसाधारण समज होतो. पण, थोड्याच वेळात काही तरुण तलवारी घेऊन रंगमंचावर दाखल होतात आणि कत्तल सुरू होते. त्यामुळे दंगल घडून गेल्याचे लक्षात येते. मोजके आणि सूचक नेपथ्य नाटकाचे वैशिष्ट्य होते. पण, ते कुणालाही व्यवस्थित वापरता आले नाही. मॉब असलेल्या नाटकामध्ये समन्वय खूप आवश्‍यक असतो. शितल दोडके यांना त्याचा ताळमेळ बसविता आला नाही.

‘ज्वालामुखी’
लेखन-दिग्दर्शन-नेपथ्य - शितल दोडके, प्रकाशयोजना - अभिषेक बेल्लारवार, ध्वनी संकलन - अशोक जांभूळकर. भूमिका ः शितल दोडके, आम्रपाली खांडेकर, संस्कृती रंगारी, शुभम बोरकर, स्वाती गायधने, कुशल रंगारी, हेमलता मेंढे, रिया नारनवरे, सुधीर पाटील, हर्षद मानकर, दिवाकर शिर्के, अन्वर शेखर, आदित्य मेश्राम, दीपक कटरे, रोशन खोब्रागडे, नरेश येंडे, मुकेश मर्जीवे.

आजचा प्रयोग
‘रक्षन्ति रक्षित’ - सकाळी ११.३० वाजता
स्थळ - सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com