बंददरम्‍यान बसवर दगडफेक

विदर्भ बंद दरम्यान कार्यकर्त्याला ताब्यात घेताना पोलिस.
विदर्भ बंद दरम्यान कार्यकर्त्याला ताब्यात घेताना पोलिस.

नागपूर - विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या विदर्भ बंदला नागपूर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. गंगाबाई घाटाजवळ बसवर दगडफेक करण्यात आली. गांजाखेत परिसरात दुकानांवर दगडफेक करण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत फिरणाऱ्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आले.

गंगाबाई घाट चौकात सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास दुचाकींवरून आलेल्या कार्यकर्त्यांनी नागपूर-गोंदिया बसवर दगड भिरकावल्याने बसची काच फुटली. मासूरकर नावाच्या व्यक्तीने ही दगडफेक केल्याचे पुढे आले आहे. दुपारी १२ वाजताच्या सुमारास अब्दुल अजीज ख्वाजा, मुकेश मासूरकर, अवधूत कोसे, राजेश बढे व त्यांचे सहकारी दुकाने बंद करण्यासाठी फिरत होते. यादरम्यान त्यांनी वाहन व शोरूमवर दगडफेक केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच तहसील पोलिसांनी घटनास्थळ गाठून विदर्भवादी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. राजेश कुकरेजा यांच्या तक्रारीनंतर कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. दुपारी पंचशील चौकात दगडफेक करण्यात आली. येथून नरेंद्र पालांदूरकर व इतरांना ताब्यात घेण्यात आले. 

याशिवाय माजी आमदार ॲड. वामनराव चटप, समितीचे मुख्य संयोजक राम नेवले, माजी आमदार उपेंद्र शेंडे, अरुण केदार, जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष राजेश काकडे, महासचिव चंद्रभान रामटेके, सुनील चोखारे, चंद्रभान भागवतकर, श्‍याम कावडकर, मारोतराव रोकडे आदींनी सकाळी व्हेरायटी चौकातून पदयात्रा सुरू केली. दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत असताना जनता चौकातून नेतेमंडळींसह एकूण २५ जणांना ताब्यात घेण्यात आले. दिलीप नरवाडीया, सुनील खंडेलवाल व त्यांच्या सहकाऱ्यांना बर्डीतून ताब्यात घेण्यात आले. काही भाग वगळता अन्य कुठेही विदर्भ बंदला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले नाही. दुपारनंतर मात्र सर्वच दुकाने सुरू असल्याचे दिसून आले.

बंदच्या हाकेला विदर्भवाद्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही तालुक्‍यांमध्ये शंभर टक्के बंद पाळण्यात आला. नागपुरातील काटोल, कळमेश्‍वर, सावनेर, मौदा तालुक्‍यांत व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दर्शविला. नागपूर शहरात मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला. 
- राम नेवले, मुख्य संयोजक, विदर्भ राज्य आंदोलन समिती 

स्वतंत्र विदर्भ ही चळवळ सुरू झाली आहे. ती आता तेलंगणप्रमाणे अधिक आक्रमक केली जाईल. कुठल्याही सत्ताधाऱ्यांना वैदर्भींच्या आंदोलनाची आज ना उद्या दखल घ्यावीच लागले.
- राजेश काकडे, अध्यक्ष, राष्ट्रीय जनसुराज्य पक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com